‘वस्त्रहरण’ मधील गोप्याने रात्रीचो राजा असणाऱ्या दशावताराच्या जीवनाचो पडदो आज उघडलो. दशावतारी कलेतील कलाकारांच्या खडतर जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या दशावतारी कथा, कलाकारांच्या व्यथेवर झणझणीत प्रकार टाकणाऱ्या ‘रात्रीचो राजा’ या नाटकाचा इन्सुली येथे शुक्रवारी शुभारंभ केला.
गीतांजली प्रॉडक्शन निर्मित ‘रात्रीचो राजा’ नाटकाचे लेखक विलास खानोलकर (कणकवली) तर दिग्दर्शक प्रकाश मोरे आहेत. या नाटकाचे निर्माते लवराज कांबळी यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. या नाटकातील कलाकार लवराज कांबळी, गीतांजली कांबळी, मोहन साटम, दशरथ घाडी, एकनाथ गवंडळकर, नंदू तळवडेकर, सचिन गावकर, सुशील वळंजू, सतीश पार्टे, केशर मांजरेकर, कमलाकर बागवे, सौरभ करवंदे, सुनील पगार, बालकलाकार सानिका भोसले व विराज कांबळी आदी आहेत.
 दशावताराचा विषय घेऊन व्यावसायिक रंगभूमीवर दशावतारी कलाकारांची व नाटकांची होणरी परवड या नाटकातून मांडली आहे. दासबोधात साडेचारशे वर्षांपूर्वी दशावताराचा उल्लेख आढळतो. कोकणात मंदिरात साजरी होणारी ही कला मूळ आहे. दशावतारी कलाकारांनी राजाश्रय नसतानाही कला जिवंत ठेवली, पण कलाकारांची परवडच अधिक होत आहे. त्यामुळे रात्रीचो राजा नाटकाने दशावतारी कलाकारांच्या जीवनात क्रांती घडेल असा विश्वास लवराज कांबळी यांनी बोलून दाखविला.
दशावतारी नाटक, मंदिरे, किंवा खासगी प्रयोग एवढय़ापुरते अवलंबून राहिले. कलाकारांनी मानधनाचा कधी विचार केला नाही, पण कला जिवंत ठेवण्यासाठी घेतलेल्या धडपडीबाबत राज्यकर्त्यांना सोयरसुतक नाही. बॅ. नाथ पैनंतर कोणीही दशावताराकडे ढुंकून पाहिले नाही, अशी खंत लवराज कांबळी यांनी व्यक्त केली.
दशावतारी कलाकार पेटारा व देव्हाऱ्याशी प्रामाणिक राहिला. दशावतारी कथा व कलाकारांची व्यथा फक्त रात्रीचो राजापुरतीच मर्यादित राहिल्याने हे संगीत व्यावसायिक नाटक आणले आहे. त्याला लोक उचलून घेतील असा विश्वास लवराज कांबळी यांनी व्यक्त केला.
मला आई-वडील लहानपणी दशावतारी नाटकाला न्यायचे, त्यावेळचा आनंद आणि दुसऱ्या दिवशी माडाच्या पिढय़ाची तलवार करून दशावतार साजरा करण्यासाठी कै. मच्छिंद्र व मी सतत पुढे असायचो. त्यामुळे आम्हाला दशावतार हे मोठे विद्यापीठ आहे असे वाटते. पण या कलेत योगदान देणाऱ्या कलाकारांकडे सत्ताधारी राजकीय नेत्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे बाबी नालंग, बाबी कलिंगणसारख्या कलाकारांच्या घरात पुरस्काराशिवाय दुसरे काही मिळणार नाही अशी खंत लवराज कांबळी यांनी व्यक्त केली.
तमाशा, लावणीने शहरांना काबीज केली. मुंबईत तर त्यासाठी तिकिटे काढून प्रयोग हाऊसफुल होतात. पण दशावतार कला चांगली असूनही तिकिटे काढून मुंबईसारख्या शहरात प्रयोग हाऊसफुल होत नाही. सरकारमान्य दशावतार नसल्याने कलाकारांना सरकारच्या सवलती मिळत नाहीत. म्हणूनच राज्यकर्त्यांना दशावतारी कलाकारांचे जीवन या नाटकातून दाखवून दशावतार व कलाकारांना ऊर्जितावस्था आणण्याचा हा प्रयत्न आहे असे लवराज कांबळी म्हणाले.
तमाशा, लावणी कलाकारांना शासन घरासह अनेक सवलती देत आले आहे. पण कोकणातील दशावतारी कलेला सरकारमान्यता नाही, त्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे दशावतारी कलाकाराचा दुर्दैवी विलास ‘रात्रीचो राजा’मधून दाखविला आहे. मालवणी नटसम्राट कै. मच्छिंद्र कांबळी यांचे स्वप्नही त्यानिमित्ताने पूर्ण होईल असे लवराज कांबळी म्हणाले.
डोबिंवलीच्या सिद्धिविनायक नाटय़ मंडळाच्या शंकर मेस्त्रीचे उत्तम सहकार्य लाभले असून अडीच तासाच्या संगीत ‘रात्रीचो राजा’ नाटकात मालवणी भाषेलाही काही प्रमाणात प्राधान्य दिले आहे असे लवराज कांबळी म्हणाले. मालवणी कलाकार तयार करण्याचा एक भाग आहे असे ते म्हणाले. महावस्त्रहरण सेलिब्रेटींनी सादर केले. त्यामुळे वस्त्रहरण नाटक हीरो बनले असेही लवराज कांबळी म्हणाले.