scorecardresearch

“२०२४ मध्ये मोठे राजकीय बदल दिसणार”, शरद पवारांनंतर बाळासाहेब थोरातांचंही सूचक विधान; म्हणाले, “देशात सध्या…”

तीन राज्यांच्या निवडणुका आणि पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालासंदर्भात बोलताना, देशात आता सरकार बदलण्याचा मूड तयार होतो आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली होती.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात संग्रहित छायाचित्र

तीन राज्यांच्या निवडणुका आणि पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालासंदर्भात बोलताना, देशात आता सरकार बदलण्याचा मूड तयार होतो आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली होती. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही सूचक विधान केलं आहे. २०२४ मध्ये देशात आणि राज्यात मोठे राजकीय बदल दिसून येतील, असं ते म्हणाले. संगमनेरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरूनही राज्य सरकारवर टीकास्र सोडलं.

हेही वाचा – “बाप मुख्यमंत्री अन् पोरग मंत्री झाल्याने एकनाथ शिंदेंना वाटलं…”, बंडखोरीबाबत ठाकरे गटाच्या खासदाराचं मोठं विधान

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

“आम्ही दगड जरी उभा केला, तरी निवडून आणू शकतो, असं म्हणणाऱ्या भाजपाला कसब्यात धूळ खावी लागली. चिंचवडमध्ये आमचा पराभव झाला असेल, पण दोन आमचेच उमेदवार तिथे उभे होते. त्यामुळे त्यांच्या एकूण मतांची बेरीज बघितली तर महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात मतं पडली आहेत. याचा अर्थ असा की जनमत हे शिंदे गट-भाजपाच्या विरोधात गेलेलं आहे आणि त्याचे परिणाम दिसायला सुरूवात झाली आहे”, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.

“देशात सध्या सुडाचं वातावरण”

“शरद पवार म्हणाले ते बरोबर आहे. देशात सध्या बदलाचे वारे आहेत. २०२४ मध्ये आपल्याला मोठे राजकीय बदल झाल्याचं दिसून येईल. देशात सध्या सुडाचं वातावरण आहे. लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्याकडून सुरू आहे”, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच “देशात महागाई आणि बेरोजगारी वाढली असून यासर्वांचा एकत्रित परिणाम २०२४ च्या निवडणुकीत दिसून येईल”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “औरंग्याच्या तुष्टीकरणावर तुम्ही…”, MIMच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकताच बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र!

पुढे बोलताना शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपाला लक्ष्य केलं. “राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या असंतोषाची भावना आहे. कांदा उत्पादक शेतकरी आज हतबल आहे. वर्षभरात कांद्याचं एक पीक घेतल्यानंतर जर तो मातीमोल झाला. तर शेतकऱ्याचं जीवन कठीण होऊन जातं, अशा परिस्थितीत सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे”, अशी मागणी त्यांनी केली. तसेच “शेतकऱ्यांच्या वीजबिलाचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. अनेकांची वीज जोडणी कापली जात आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला संसार करणं कठीण झालं असताना, तो वीजबिल कसा भरेल, याचा विचारही सरकारने करावा”, असेही म्हणाले.

हेही वाचा – “देशात सरकार बदलाचे वारे आहेत”, शरद पवारांच्या विधानावर विखे-पाटलांची खोचक टीका; म्हणाले, “रस्त्यावर बसलेल्या पोपटाची…”

दरम्यान, सरकारच्या जाहिरातींवर होणाऱ्या खर्चावरूनही त्यांनी भाजपा-शिंदे गट सरकारवर टीकास्र सोडलं. “जाहिरातीवर किती खर्च करावा, याचा विचार सरकारने करायला हवा. हेच पैसे लोकांच्या भल्यासाठी खर्च व्हायला हवे होते. केवळ जाहिराती देऊन कोणी गतीमान होत नाही”, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-03-2023 at 19:23 IST