‘सरस ते साहित्य आणि समरस तो साहित्यिक’ हे ब्रीदवाक्य घेऊन सामाजिक समरसता व बंधुत्व या मूल्यांची जोपासना करणारे साहित्य समाजापुढे आणण्याच्या हेतूने विषयनिष्ठ संमेलन भरविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या समरसता साहित्य परिषदेच्या वतीने ‘आदिवासी साहित्य व समरसता’ या विषयावर ९ ते १० फेब्रुवारी या कालावधीत १५ वे साहित्य संमेलन भरविण्यात येणार आहे. जुन्नर येथे होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मणराव टोपले यांची निवड झाली आहे.
संमेलन कार्यवाह अनिल जोगळेकर असून कार्याध्यक्षपदी अ‍ॅड. शरद गुरव आहेत. सामाजिक समरसतेचा विचार समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश असतो. यानिमित्ताने समरसता साहित्य परिषदेतर्फे विशेषांक काढण्यात येत आहे. या विशेषांकाचे स्वरूप फक्त स्मरणिका न राहता त्यात आदिवासी जीवन, कला व साहित्य या विषयांवर प्रकाशझोत पडावा ही इच्छा आहे. विशेषांकामध्ये व्यासंगी व अभ्यासू साहित्यिक आपले साहित्य पाठवू शकतात.
परिषदेतर्फे या आदिवासी साहित्याची एक स्वतंत्र पुस्तिकाही संमेलनात प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यासाठी साहित्यिक व कलाप्रेमींनी आपले साहित्य २४ फेब्रुवारीपूर्वी ‘सावित्रीबाई फुले अभ्यासिका, डॉ. शामराव उद्यान, एकबोटे कॉलनी, शंकरशेठ रस्ता, घोरपडे पेठ, पुणे ४११०४२८’ या पत्त्यावर पाठवावेत. विश्वास गांगुर्डे ९४२२३२३२६४ यांच्याशी संपर्क करावा. संमेलनात ग्रंथदिंडी, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध परिसंवाद, कवी संमेलन आणि आदिवासी साहित्यिकांच्या मुलाखती असे विविधांगी कार्यक्रम होणार आहेत.