संगमनेर: तालुक्यातील विविध आठ रस्त्यांना तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. मात्र, नवीन आमदाराने तालुक्यासाठी आठ महिन्यांत एक रुपयाचा निधी न आणता केवळ राजकारणासाठी मंजूर रस्त्यांची कामे रद्द करण्याचे दुर्दैवी राजकारण केले असल्याचा आरोप बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी केला.

मर्जीतील ठेकेदारांना सांभाळण्यासाठीच हा उद्योग केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, यामागे आमदार अमोल खताळ यांच्या बदनामीचा डाव असल्याची टीका शिवसेनेने केली असून, अशाच प्रकारे आमदार सत्यजित तांबे यांना प्रश्न विचारावे, असे आव्हान पक्षातर्फे देण्यात आले आहे.

माजी मंत्री थोरात यांनी १३ मार्च २०२४ रोजी ग्रामविकास विभागाकडे संगमनेरमधील ८ रस्त्यांचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश होऊन काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर ४ ऑक्टोबर २०२४ च्या निर्णयानुसार ४० कोटी ७३ लाख ८१ हजार रुपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली.

यामध्ये डिग्रस ते रणखांबवाडी, चिखली ते जवळेकडलग, खरशिंदे ते खांबे, मिर्जापुर ते धांदरफळ खुर्द, पारेगाव खुर्द ते तिगाव वडझरी, साकुर ते बिरेवाडी, शिंदोडी ते ठाकरवाडी, तासकरवाडी ते खंडेरायवाडी या कामांचा समावेश होता. मोठ्या प्रतीक्षेनंतर हे रस्ते होणार असल्याने त्या त्या ठिकाणचे गावकरीही आनंदी होते. मात्र, ऑगस्ट २०२५ च्या नव्या अध्यादेशानुसार ही सर्व कामे रद्द करण्याचा दुर्दैवी निर्णय घेण्यात आला असल्याचे खेमनर म्हणाले.

मागील आठ महिन्यांत नवीन सरकारने एक रुपयाचा निधी न आणता जुन्याच निधीवर उद्घाटनाचे कार्यक्रम करणाऱ्या नवीन लोकप्रतिनिधीने आपल्या मर्जीतील ठेकेदारांना सांभाळण्यासाठी ही सर्व कामे रद्द करून आणली आहेत. जेणेकरून ही जुनीच कामे पुन्हा नव्याने टेंडर करता येतील आणि आपल्या मर्जीतील ठेकेदारांना काम देता येईल, असा डाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

रस्त्यांची कामे रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारचा असून, आमदार अमोल खताळ यांचा संबंध नाही. हा निर्णय एकट्या संगमनेर तालुक्यासाठी नाहीतर राज्यातील सर्वच तालुक्यांबाबत घेण्यात आला. तरीही आमदार खताळ यांच्यावर टीका करणारे माजी आमदार थोरात त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करीत आहेत. रद्द झालेल्या कामाबाबत आपले भाचे आमदार सत्यजित तांबे यांना जाब का विचारत नाहीत ॽ – विठ्ठल घोरपडे, जिल्हा संघटक, शिवसेना शिंदे गट

रद्द झालेली रस्त्यांच्या कामामध्ये माझा कोणताही संबंध नाही. निर्णय का घेतला याची माहिती घ्यावी लागेल. कामासंदर्भात माझा सातत्याने पाठपुरावा होता. प्रशासकीय स्तरावर काही त्रृटी असतील, तर त्याची चौकशी करून सुधारणा करता येईल. मात्र, काहींचा स्वार्थ यामध्ये दडला असेल तर तेही काळाच्या ओघात समोर येईलच. – आमदार अमोल खताळ