पंढरपूर : संत नामदेव महाराज यांनी भागवत धर्माची पताका देशभर नेली. वारकऱ्यांना देशभर प्रतिष्ठा मिळवून दिली. अशा भक्तशिरोमणी श्री संत नामदेव महाराज आणि इतर संतांचे विचार १४ भाषेत पोहचविण्याचे काम करणार आहे. सरकार या बाबत पाठपुरावा करेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. श्री भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्काराने एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आले.

संत नामदेव महाराजांच्या ३७५ व्या संजीवन समाधी स्मृती सोहळ्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. येथील संत नामदेव महाराज मंदिरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, अमळनेरकर महाराज, चावरे महाराज, राणा महाराज वासकर, संत नामदेव महाराज यांचे सर्व वंशज, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील तसेच संत, महाराज, वारकरी, फडकरी आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, मला आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले. मात्र, ज्या ठिकाणी साक्षात विठ्ठलाचे पदस्पर्श झाले आणि संत नामदेव महाराज यांच्या जन्म ठिकाणी म्हणजेच संत नामदेव महाराज मंदिरात हा पुरस्कार मिळाला, हे माझे भाग्य समजतो. खरं तर हा पुरस्कार माझा नसून हा सर्व सहकारी, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके वारकरी यांचा आहे, असे मी नम्रपणे सांगतो, असे शिंदे म्हणाले.

संत नामदेव महाराज यांनी भागवत धर्माची पताका केवळ महाराष्ट्रात नाही तर पुढे देशभर नेली. वारकऱ्यांना देशभर प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. संत नामदेव महाराजांचे व इतर संतांचे विचार १४ भाषेत पोहचविण्यासाठी प्रयत्न करू, सरकारच्या माध्यमातून हे कार्य करणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले. सरकार नेहमीच कष्टकरी, शेतकरी, वारकरी यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. राजकीय अधिष्ठानपेक्षा धार्मिक अधिष्ठानाला आम्ही प्राधान्य देतो. मंदिरांना संस्कार केंद्र मानून राज्य सरकारने गोमातेला राजमातेचा दर्जा दिला. संत नामदेवांनी भक्ती बरोबर ज्ञानाचा प्रसार केल्यामुळे ही शिकवण देशभर पसरली आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराजांचे वंशज यांनी पगडी, वीणा तसेच सन्मानपत्र देवून सन्मानित केले. श्री भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज हा पहिलाच पुरस्कार शिंदे यांना देण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नामदेव पायरी व विठ्ठल दर्शन

एकनाथ शिंदे यांनी संत नामदेव पायरी, संत चोखोबा यांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. आषाढी यात्रेच्या काळात शिंदे इथे आले होते. मात्र, त्यांनी विठ्ठलाचे लांबून दर्शन घेतले. राज्यातील बळीराजा, वारकरी यांना सुखी ठेव, असे साकडे विठुरायाला घातले आहे. आमचा अजेंडा खुर्ची नाही. ज्यांनी खुर्चीत बसवले त्यांचे प्रश्न सोडवणे हा अजेंडा आहे. धार्मिक कार्यक्रमाला आलो आहे त्यामुळे राजकीय प्रश्न नको, असे शिंदे यांनी देवदर्शन झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना सांगितले.