राहाता: शिर्डीतील साईबाबा मंदिरातील खोल्यांमध्ये बॉम्ब ठेवून उडवून देण्याच्या धमकीचा मेल साईबाबा संस्थानला पुन्हा प्राप्त झाल्याने खळबळ उडाली. साईबाबा मंदिर प्रशासनाने या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ई-मेलमध्ये मंदिरातील समाधी स्थळ आणि द्वारकामाई येथे स्फोटक ठेवले असल्याचा दावा करण्यात आला. माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले व त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. साईभक्तांची तपासणी करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भगवंत मान नावाच्या व्यक्तीने साईबाबा मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी संस्थानच्या ई-मेलवर पाठवली. धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव ईमेल आयडीवरून समोर आले. त्यानंतर मंदिर प्रशासनाने तातडीने शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. साईमंदिर समाधी स्थळ आणि द्वारकामाईमध्ये ४ नायट्रीक बॉम्ब ठेवण्यात आले ते दुपारी १ वा. निष्क्रिय होतील. त्यामुळे भाविक व कर्मचारी यांना तत्काळ बाहेर काढावे, अशी धमकी दिली आहे. मंदिर संरक्षण अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी ‘ई मेल’ पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
धमकी कोठून आली? ती खरी की खोटी? याचा तपशीलवार शोध पोलीस घेत आहेत. मंदिर परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. संस्थाननेही श्रद्धाळूंना घाबरून न जाता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
यापूर्वीही मे महिन्यात साईं मंदिराला बॉम्बने उडवण्याचा धमकीचा ई-मेल मिळाला होता. त्यानंतर साईभक्तांची सुरक्षेच्या दृष्टीने दर्शन रांगेच्या प्रवेशद्वारावर तपासणी सुरू करण्यात आली. भाविकांना तपासणीनंतरच प्रवेश दिला जातो. अशातच मंदिराला पुन्हा धमकीचा ई-मेल मिळाल्याने पोलीस व संस्थानची सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
या धमकीच्या पार्श्वभूमीवर मंदिर, परिसरात व दर्शनरांगेची बॉम्बशोधक पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. असा कोणताही प्रकार आढळून आला नाही. खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पूर्वी आलेल्या धमकीच्या मेलची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. आज आलेल्या या धमकीच्या मेलबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. – गोरक्ष गाडीलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान, शिर्डी