सोलापूर : सध्या सुरू असलेल्या रमजान महिन्यात मशिदीत नमाज पठणाची वेळ वाढविण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान सशस्त्र हल्ल्यात झाले. बार्शी शहरात घडलेल्या या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले असून या प्रकरणी सात हल्लेखोरांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फारूख रजाक सौदागर हे या सशस्त्र हल्ल्यात गंभीर जखमी झाले. तर जुबेर मेहताब सौदागर व सद्दाम फरीद सौदागर हे किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी वहाब इस्माईल सौदागर, त्याचा भाऊ अयाज इस्माईल सौदागर, शाहनवाज वहाब सौदागर, रेहान फयाज सौदागर, मुस्तकीन अयाज सौदागर आदी सात जणांविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या रमजान महिना सुरू असल्यामुळे सायंकाळी ठरलेल्या वेळेत रोजा सोडून नमाज पठणासाठी मशिदींमध्ये मुस्लीम आबालवृद्धांची गर्दी होते. त्याप्रमाणे बार्शीच्या मंगळवार पेठेतील नुरी मशिदीत सायंकाळी रोजा सोडण्यासाठी मुस्लीम बांधव एकत्र आले असताना नमाज पठणाची वेळ वाढविण्याच्या कारणावरून वहाब इस्माईल सौदागर व त्याचा भाऊ अयाज यांनी मशिदीचे विश्वस्त फरीद खलील सौदागर व फारूख सौदागर यांच्याशी वाद घातला. शिवीगाळ व शाब्दिक बाचाबाची झाली होती. नंतर हा वाद मिटविण्यासाठी फारूख सौदागर हे अयाज सौदागर याच्याकडे गेले. रमजानचा महिना सुरू असताना आपापसात विनाकारण वाद घालून भांडण करणे योग्य नाही, वाद न वाढविता मिटवू या म्हणून समजूत घालण्याचा प्रयत्न फारूख सौदागर यांनी प्रयत्न केला. तेव्हा रागाच्या भरात त्यांच्यावर सशस्त्र हल्ला झाला.