वाळूजपासून साधारण २० किलोमीटर अंतरावर पाच सशस्त्र दरोडेखोरांनी लाकडी दांडके व कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात पती-पत्नी व एक महिला असे तिघे जबर जखमी झाले. गुरुवारी मध्यरात्रीनंतर गंगापूर तालुक्यातील शिरोडी शिवारात घडलेल्या या प्रकाराने लोकवस्तीपासून दूर असलेल्या या परिसरात मोठी दहशत पसरली आहे. हल्ल्यातील जखमींना रात्रभर कोणतीही मदत मिळू शकली नाही. शुक्रवारी सकाळी जखमी व्यक्तींनीच वाळूज पोलीस ठाणे गाठून दरोडय़ाची माहिती दिली.
कविता दिलीप शेंडगे (वय २६), तिचा पती दिलीप शेंडगे (वय ३५) व दिलीपची आत्या भिकुबाई वैद्य (वय ५५, तिघेही शिरोडी शिवार, तालुका गंगापूर) अशी जखमींची नावे आहेत. गुरुवारी रात्रीचे जेवण घेतल्यावर शेंडगे पती-पत्नी, त्यांची दोन लहान मुले व आत्या असे पाचजण घरासमोरील अंगणात झोपी गेले होते. मध्यरात्रीनंतर सव्वाबाराच्या दरम्यान हातात लाकडी दांडके व कुऱ्हाडी अशा तयारीत १८ ते २५ वयोगटातील ५ दरोडेखोर तेथे आले. त्यांनी शेंडगे पती-पत्नी व श्रीमती वैद्य या तिघांवर एकदम हल्ला चढविला. त्यांच्याकडून किल्ल्या हिसकावून घेत घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, तसेच रोख २५ हजार रुपये असा ४४ हजार ८०० रुपयांचा ऐवज लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला. १५-२० मिनिटेच हा प्रकार घडला. दरोडेखोरांनी अंगात काळे शर्ट व अर्धी चड्डी घातली होती, ते मराठीतून बोलत होते. हल्ल्यात जखमी झालेल्या शेंडगे दाम्पत्य व वैद्य यांच्या मदतीला नंतर कोणीही धावले नाही. लोकवस्तीपासून दूर राहणाऱ्या या कुटुंबाने भीतीपोटी रात्र तशीच काढली व सकाळी सव्वाआठच्या दरम्यान स्वत:च वाळूज पोलिसांना भेटून दरोडय़ाची माहिती दिली. पोलिसांनी हालचाली करून श्वानपथकासह घटनास्थळी धाव घेतली. जाताना दरोडेखोरांनी शेंडगे यांच्या घरातील पेटी नेली होती. पेटीतील ऐवज काढून घतल्यावर ती काही अंतरावर टाकून दिली. तेथपर्यंत श्वानाने माग काढला. नंतर मात्र श्वान घुटमळले. जखमींना वाळूजच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सशस्त्र दरोडय़ामुळे या शिवारात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.