भिगवणजवळील अपघातात नगरचे तिघे ठार

पुणे-सोलापूर रस्त्यावर भिगवणजवळ मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात नगर शहरातील तिघे जागीच ठार झाले. मृतांमध्ये एका दाम्पत्याचा समावेश आहे. इंडिका मालमोटारीवर मागून आदळल्याने हा अपघात झाला.

पुणे-सोलापूर रस्त्यावर भिगवणजवळ मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात नगर शहरातील तिघे जागीच ठार झाले. मृतांमध्ये एका दाम्पत्याचा समावेश आहे. इंडिका मालमोटारीवर मागून आदळल्याने हा अपघात झाला.
मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास झालेल्या या अपघातात श्यामराव कृष्णराव पवार, आशालता श्यामराव पवार या दाम्पत्यासह (रा. मिलन अपार्टमेंट, नवनाथनगर, नगर), मिलिंद भरत पवार (रा. समतानगर, नगर) हे तिघे जागीच ठार झाले. याच गाडीमधील विलास कृष्णराव पवार, शारदा भरत पवार, वैशाली सुरेश पवार, सुरेश कृष्णराव पवार (सर्व राहणार नगर) हे जखमी झाले आहेत. हे सर्व इंदापूर येथे नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. तेथून परतताना भिगवणजवळ हा अपघात झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की नगर येथील पवार कुटुंबीय इंदापूर येथील नातेवाइकाच्या अंत्यसंस्काराहून परतताना सोलापूरहून नगरकडे जात होते. भिगवणजवळ त्यांची मारुती इटनरे मोटार (क्रमांक एमएच १६-एटी ३९१५) भरधाव वेगात पुढे चाललेल्या मालमोटारीवर मागून आदळली. मारुतीच्या चालकाला येथील चढावर रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. ही धडक एवढी जोरदार होती, की यात तिघे जागीच ठार झाले. शिवाय मोटारीचाही चांगलाच चेंदामेंदा झाला. अपघातानंतर जखमींना भिगवण येथील रुग्णलयात आणून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Three killed of nagar in accident near bhigwan