दुष्काळाच्या गर्तेत सापडलेला शेतकरी शेतात कमाई नसताना आता वीजबिलाच्या अवास्तव रकमेच्या दणक्याने आत्महत्या करण्याच्या मानसिकतेपर्यंत पोचल्याचे चित्र जिल्हय़ात निर्माण झाले आहे. तुळजापूर तालुक्यातील गरीब शेतकऱ्याला महावितरणने चक्क तीन लाख रुपयांचे बिल पाठवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठच चोळले आहे.
तुळजापूर तालुक्यातील कसई येथील या शेतकऱ्यास तब्बल ३ लाख ९ हजार ४२० रुपयांचे वीजबिल पाठवण्याचा प्रताप महावितरणने केला. येथील शेतकरी अभिमान नामदेव कोळी यांच्या राहत्या घराचे एक वर्षांचे वीजबिल या रकमेचे दिले आहे. मीटर घेतल्यानंतर बिलाचे वाटपही केले नाही. सतत विचारणा केल्यानंतरही वीजबिल वेळेत दिले नाही. नोव्हेंबरसाठी कंपनीने कोळी यांना ५२ हजार २२० बिल दिले, तर डिसेंबरच्या बिलात २ लाख ५७ हजार २०० रुपये बाकी दाखवली.
चालू व थकबाकीपोटी ३ लाख ९४ हजार ४२० रुपये बिल आकारणी असल्याचे महावितरणने कळवले. ही बाब शेतकऱ्याने कंपनीच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर शेतकऱ्यास मीटर बदलून दिले. परंतु बिल मात्र बदलून दिले नाही. या प्रकाराने या शेतकऱ्याचे कुटुंब हादरून गेले. महावितरणकडून ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांवर अन्याय केला जात आहे. या शेतकऱ्याच्या बिलावर ‘तुळजापूर समाधान रोचकरी’ असा पोल नावाने उल्लेख आहे, तर वर्षभर मीटर पाहण्यासाठी कंपनीचा कोणताही प्रतिनिधी आला नाही. या प्रकाराने हादरलेल्या या कुटुंबाने तत्काळ न्याय मिळावा अन्यथा नापिकीप्रमाणे कंपनीच्या अन्यायाला कंटाळून आत्महत्या केल्याशिवाय मार्ग नाही, अशी व्यथा व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकाराला तुळजापूर शहर व तालुक्यातील लोकही वैतागले आहेत. महावितरणकडून केवळ कारभारावर बोळा फिरवण्याचे काम केले जाते. कोणतेही काम गांभीर्याने होत नाही. अधिकारी-कर्मचारी मनमानीपणे कार्यालयीन कामकाज करतात, तर चुकीचे काम केल्यानंतर कोणालाही जबाबदार धरून या प्रकरणी दोषी ठरवले जात नाही. चुकीबद्दल कारवाईच होत नसल्याने कारभारात अनागोंदी व मनमानी पसरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three lakhs electric bill to farmer
First published on: 18-01-2015 at 01:40 IST