डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराज यांना लिहिलेली तीन महत्त्वपूर्ण पत्रे प्रकाशात आली आहेत. राजर्षी शाहू व घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांच्या ऋणानुबंधावर आणि वैचारिक नात्यावर या निमित्ताने नवा प्रकाझोत टाकला गेला आहे. राजर्षी शाहूंचे कोल्हापूर संस्थानचे दिवाण सर रघुनाथराव सबनीस यांच्या खाजगी दप्तरात ही पत्रे मिळाली असून ती मंगळवारी डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी यांच्या वतीने प्रकाशित केली जाणार आहेत. अभ्यासिका डॉ. मंजुश्री पवार यांनी ही पत्रे प्रकाशात आणण्याचे काम केले आहे.
आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात फुले-शाहू-आंबेडकर कालखंडाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या महापुरुषांच्या परिवर्तनवादी विचार व कृतींनी त्यांचा काळ हा बहुजनांच्या प्रबोधनाचा काळ मानला जातो. राजर्षी शाहू महाराज व डॉ. आंबेडकर या दोन महापुरुषांमध्ये वैयक्तिक व वैचारिक ऋणानुबंध निर्माण झाले होते. राजर्षि शाहूंच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात डॉ. आंबेडकर यांचा उदय झाला. दोघांमध्ये भावनिक नाते होतेच. त्याशिवाय दलितांविषयीची कणव व सामाजिक स्वातंत्र्य, सामाजिक न्याय यासाठीचा संघर्ष हा समान धागा होता. या दोघांच्या नात्यातील गुंफण दर्शविणारी अनेक पत्रे आतापर्यंत प्रकाशित झाली आहेत. आता महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीने डॉ. आंबेडकरांनी राजर्ष िशाहूंना लिहिलेल्या तीन अप्रकाशित पत्रांचे प्रकाशन करण्याचे ठरविले आहे. पत्रकर्त्यांच्या अंतकरणातील भावना पत्रलेखनातून उमटल्याचे दिसते.
सुमारे ९५ वर्षांपूर्वी म्हणजे १९२० व १९२१ या दोन वर्षांत डॉ. आंबेडकरांनी राजर्षी शाहूंना सदरची तीन पत्रे लिहिली होती. राजर्ष िशाहूंचे मार्गदर्शक, सल्लागार व कोल्हापूर संस्थानचे दिवाण सर रघुनाथराव सबनीस यांच्या खाजगी दप्तरात ही तीन पत्रे होती. त्यांच्या पणती अॅड. सुमेधा सबनीस व प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी ही पत्रे महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीकडे सुपूर्द केली. त्याचे संशोधन इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या कन्या डॉ. मंजूश्री पवार यांनी केले आहे.
पहिल्या पत्रात डॉ. आंबेडकरांनी १९२० साली नागपूरला झालेल्या अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेच्या पाश्र्वभूमीवर पत्र पाठवून राजर्ष िशाहूंचे अध्यक्षीय भाषण छापण्यापूर्वी ते वाचावयास मिळावे असा उल्लेख केला होता. या पत्रात आंबेडकरांनी नाशिकच्या काही मंडळींकडून आलेल्या निनावी अर्जाचाही उल्लेख केला आहे. दुसरे पत्र ६ ऑक्टोबर १९२० रोजी लंडनहून लिहिलेले आहे. या पत्रात डॉ. आंबेडकर यांनी आपली आíथक अडचण मांडून २०० पौंडांची जरुरी असल्याचे राजर्षी शाहूंना कळविले होते. या पत्रात डॉ. आंबेडकर यांनी राजर्ष िशाहूंना निष्काम, दीनदयाळू, सत्पुरुष असे म्हटले होते. या पत्रात एक अत्यंत नवीन व विशेष गोष्ट उल्लेख करण्यात आलेली आहे, ती म्हणजे कोल्हापूर संस्थानचे स्टेट रेकॉर्ड चोरीस गेल्याची वार्ता डॉ. आंबेडकर यांना लंडनमध्ये कळली होती. तिसरे पत्र इंग्रजी भाषेत असून त्यामध्ये डॉ. आंबेडकरांनी १०७ पौंडांची मदत मागील आठवडय़ात मिळाल्याबद्दल राजर्षी शाहूंचे आभार मानले आहेत. आपल्या उभयतांचे संबंध अत्यंत घनिष्ट, सलोख्याचे व प्रामाणिकपणाचे आहेत, या संबंधांना आपल्या कुवतीने बळकटीत आले आहेत, असा उल्लेख करून मायदेशी आल्यावर मदतीची परतफेड करू असे डॉ. आंबेडकरांनी म्हटले आहे. स्टेट रेकॉर्ड चोरीस गेले नसून त्यातील काही गुप्त पत्रव्यवहार एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केला होता असाही उल्लेख या पत्रात आहे.
अशाप्रकारे डॉ. आंबेडकर व राजर्षी शाहू या दोन्ही महापुरुषांच्या जीवनचरित्राच्या साधनांमध्ये तसेच सामाजिक न्यायाच्या इतिहासात मोलाची भर या पत्रांमुळे पडणार आहे, असे डॉ. मंजूश्री पवार म्हणाल्या.
संग्रहित लेख, दिनांक 14th Apr 2015 रोजी प्रकाशित
आंबेडकर-शाहू महाराजांमधील ३ पत्रे प्रकाशात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराज यांना लिहिलेली तीन महत्त्वपूर्ण पत्रे प्रकाशात आली आहेत. राजर्षी शाहू व घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांच्या ऋणानुबंधावर आणि वैचारिक नात्यावर या निमित्ताने नवा प्रकाझोत टाकला गेला आहे.
First published on: 14-04-2015 at 02:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three letters open in babasaheb ambedkar and shahu maharaj