छत्रपती संभाजीनगर : बेरोजगारीवर मात करता यावी म्हणून मराठवाड्यासह, विदर्भातील बुलढाणा व यवतमाळवरुन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या बेरोजगारांची संख्या किती ? – उत्तर संभाजीनगर शहरातील पोह्यांमध्ये दडले आहे. शहरातील क्रांती चौकात दररोज तीन टन पोहे लागतात. पहाटे तीन ते दुपारी १२ वाजेपर्यंत स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थी नाष्टा करायला येतात. या चौकातील आकडे आता पुन्हा वाढू लागले आहेत.
पोह्यांशी संबंधित ही ‘न्याहारी’ दुनिया. ज्याची ‘सकाळ’ मात्र, मध्यरात्री अडीचच्या सुमारास होते आणि दुपारी १२ च्या सुमारास सामसूमही. रोजचे तीन टन पोहे फस्त झाल्यानंतर विविध स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिका आणि शैक्षणिक संस्थात्मक जाळे निर्माण झालेल्या महानगरातल्या प्रचलित कट्टा स्थळांवर सकाळच्या प्रहरात न्याहारीवेळचे हे चित्र. पुण्यासारख्या मोठ्या शहरांची गरज पाच टनापर्यंतही असू शकेल असे सांगण्यात येते. संभाजीनगर शहरात हातगाडे आणि नाशता केंद्र मिळून ३०० च्या आसपासची संख्या आहे.
या केंद्रांवर पोह्यांचे बहुप्रकार आस्वादायला मिळतात. दही पोहे, रस्सा पोहे, काही ठिकाणी चना पोहेही मिळतात. विशेषतः विदर्भातील मुलांची संख्या जिथे अधिक आहे त्या परिसरात. विदर्भातील अकोला, बुलढाणा भागात चना पोहे प्रसिद्ध. शहरातही वरील दोन जिल्ह्यांसह वर्धा, यवतमाळ, अमरावतीचे तरुण स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आलेले आहेत. पुण्याच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगर हे गावाकडे येण्या-जाण्यास मध्यवर्ती ठिकाण म्हणून. पोह्यांमध्ये मटकी पोहे, चटणी पोहे, मसाला भात-पोहे, असेही अनेक प्रकार आहेत.
साधारण १५ ते २० रुपयांमधील हा पोहे नाश्ता विद्यार्थी तरुणांच्या खिशाला परवडणारा. दुपारच्या जेवणापर्यंतची भूक भागवणारा किंवा जे काही तरुण एकवेळचेच भरपेट जेवण घेतात, त्यांची “वेळ” निभवून नेणारा पदार्थ. छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक, सिल्लेखाना दरम्यानच्या भागात शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची, बँकांच्या परीक्षेची तयारी करणारे तरुण उमेदवार, मुली, बदलीहून आलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी, अशी पोळा फुटावा तशी ही गर्दी करतात. सकाळच्या सातपासून दुपारी बारा पर्यंतच्या वेळात परिसरातील नाश्ता केंद्र गजबजलेली असतात. यामध्ये नाश्त्याचे विविध पदार्थ समोर मांडलेले असले तरी पसंती मिळते ती पोह्याला. अशीच गर्दी बजरंग चौकातील चार-दोन पोह्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या दुकानांवर, टिव्ही सेंटर परिसरात असते. या पोह्याच्या व्यवसायावरच अनेक तरुणांचेही जीवन सावरले आहे.
करोनापूर्वी पोह्यांचा व्यवसाय सुरू केला. त्यावेळी आपला एक भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागला. त्यांच्या संख्येवरून क्रांती चौकाजवळचे ठिकाण निवडले. पहाटे अडीचला आम्ही उठतो. ३ वाजता पोह्यांचा पहिला घाणा निघतो. रात्र पाळीवाले नाश्ता करूनच घरी जातात. तेव्हापासून दुपारी १२ पर्यंत ७० ते ८० किलो पोहे, २० ते २५ किलो मोड आलेली मटकी, ७ किलो शाबुदाना खिचडी, १५० पेक्षा अधिक सामोशांचा नाश्ता जातो. आज आठ ते दहा जण आपल्याकडे काम करतात.- किशोर व शिवाजी आवटे
छत्रपती संभाजीनगर शहराची साधारण १५ लाख लोकसंख्या आहे. महिन्याला १०० टन पोहे लागतात. पोह्यात तीन प्रकार आहेत. नाश्त्यासाठीचा पोहा, पातळ पोहा आणि चिवड्याचा पोहा. पातळ व नाश्त्याचा पोहा नवसारी (गुजरात) येथून येतो. व्यावसायिक हातगाडेवाले छत्तीसगडच्या राजनांदगावचा पोहा वापरतात. यांशिवाय उज्जैनजवळचा भाटापारा येथूनही पोहा येतो. दळण-वळण आणि लेबरचार्जमुळे पोह्याचा दर वाढला आहे. ३०० ते ७०० रुपये रोज कामगार घेतात. एज्युकेशन हब, टुरिस्ट सेंटर, विभागीय पातळीवरील प्रमुख शहर असल्याने प्रशासकीय बैठका, औद्योगिक नगरी, या कारणांमुळे पोह्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.- संजय कांकरिया, अध्यक्ष व्यापारी महासंघ