ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या जंगलात मोकाट कुत्रे सोडण्याच्या महापालिकेच्या प्रतापामुळे या जिल्हय़ातील वाघांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. महापालिकेने हा प्रकार तातडीने बंद करावा; अन्यथा वन कायद्यांतर्गत महापालिका तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची नोटीस चंद्रपूर वन विभागाने महापालिका आयुक्तांना बजावली आहे.
शहरात सध्या मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. रात्रीच्या वेळी भुंकणे आणि चावा घेण्यामुळे लोक त्रासले आहेत. महापौर संगीता अमृतकर यांनी स्वत: पुढाकार घेऊन कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी लावून धरली होती. जोवर कुत्र्यांचा बंदोबस्त होणार नाही तोवर गाडीत बसणार नाही, अशी प्रतिज्ञासुध्दा त्यांनी घेतली होती. महापालिका आयुक्त प्रकाश बोखड यांनी कुत्रा गाडी घेऊन शहरात पकडलेले कुत्रे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या लोहारा व घंटाचौकीच्या जंगलात नेऊन सोडण्याचा प्रताप सुरू केला. मात्र, याची माहितीसुध्दा वन खात्याला दिली नाही. दरम्यान, आज ग्रीन प्लॅनेट सोसायटीने याबाबत तक्रार चंद्रपूर वन विभागाकडे केली. कुत्र्यांच्या जंगलातील वास्तव्याने ‘कॅरी कॅनी डिस्टेंपर व्हायरस’ हा गंभीर आजार वाघांना होत असून, त्यामुळे वाघ मृत्यमुखी पडत असल्याचे निदर्शनास आणून दिले. सध्या या आजाराने जगभर थमान घातले असून त्यावर प्रकारचे औषध नाही. त्यामुळे भारतीय वन्यजीव संस्था व वन मंत्रालयाने वाघांच्या अस्तित्वासाठी कुत्र्यांपासून लागण होणारा हा आजार इतरत्र पसरू नये म्हणून काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, येथे महापालिका आयुक्तांनी स्वत: कुत्र्यांना जंगलात सोडण्याचे निर्देश दिले आहेत. वन खात्याच्या निदर्शनास ही बाब येऊ नये म्हणून रात्रीच्या अंधारात कुत्र्यांना जंगलात सोडले जात आहे. ही बाब ग्रीन प्लॅनेट सोसायटीने उघडकीस आणताच चंद्रपूर वन विभागाचे विभागीय वन अधिकारी एन.डी. चौधरी यांनी आयुक्तांना नोटीस पाठविली असून, हा प्रकार बंद करावा, अन्यथा १९७२ च्या वन कायद्यान्वये कायदेशीर व दंडात्मक कारवाई करू, असा इशारा दिला आहे.
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात ताडोबा व लगतच्या परिसरात बिबटय़ांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. हे मृत्यू कुत्र्यांच्या व्हायरसमुळे तर झाले नसावेत, असाही प्रश्न आता वन्यजीव प्रेमींनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून, वन मंत्री पतंगराव कदम, चंद्रपूर वन विभागाने मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनासुध्दा कळविण्यात आले आहे.
वन्यजीव प्रेमींची मागणी
लोहारा व घंटाचौकीचे जंगल अतिशय घनदाट असून वाघांचे अस्तित्व तेथे आहे. एखादा प्राणी जंगलात सोडायचा झाल्यास त्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते. नंतरच त्याला जंगलात सोडले जाते. कुत्र्यांना जंगलात सोडण्यास सक्त मनाई आहे. दरम्यान, या गंभीर प्रकाराबाबत आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी वन्यजीव प्रेमींनी लावून धरली आहे.