होळी, धूलिवंदनानिमित्त ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, मेळघाट, पेंच व सहय़ाद्री हे राज्यातील चारही व्याघ्र प्रकल्प सलग दोन दिवस १६ व १७ मार्च रोजी बंद ठेवण्यात आले आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी (वन्यजीव) तसे निर्देश दिले असल्याने या दोन दिवसांत पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी करता येणार नाही.
दरवर्षी होळी व धूलिवंदन या सणाच्या निमित्ताने राज्यातील व्याघ्र प्रकल्प सलग दोन दिवस बंद ठेवण्यात येतात. पर्यटक व्याघ्र प्रकल्पात येऊन मद्यधुंद अवस्थेत गोंधळ करीत असल्याने तसेच प्लास्टिक व रंगामुळे वन्यप्राण्यांना त्रास होत असल्याने वन्यजीव विभागाच्या वतीने दरवर्षी व्याघ्र प्रकल्प बंद ठेवले जातात. यावर्षीसुध्दा ताडोबा, मेळघाट, पेंच व सहय़ाद्री हे चारही व्याघ्र प्रकल्प पर्यटनाच्या दृष्टीने बंद ठेवण्यात येणार आहेत.
ताडोबा व मेळघाट प्रकल्पात प्रवेशाची ऑनलाईन बुकींग होते. रविवार १६ व सोमवार १७ मार्च रोजी होळी व धूलिवंदन आहे. सलग दोन दिवस सुटय़ा आल्याने लोक विकएंडला फिरायला जातात. त्यामुळे बहुतांश लोकांनी पर्यटनाच्या दृष्टीने व्याघ्र प्रकल्पाला प्राध्यान्य दिले. परंतु सलग दोन दिवस प्रकल्प बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. केवळ वन्यप्राण्यांना त्रास होऊ नये या एकाच उद्देशाने प्रकल्प बंद ठेवण्यात येतो. त्यामुळे यंदाही पर्यटकांसाठी व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशव्दार बंद आहे. रविवार, सोमवार सुटी आल्याने व मंगळवारी ताडोबा प्रकल्पाला साप्ताहिक सुटी असल्याने आता बुधवार, १९ मार्च रोजीच पर्यटकांसाठी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. सलग तीन दिवस ताडोबा बंद राहणार असल्याने पर्यटकांसोबतच व्यावसायिकांनाही त्याचा फटका सहन करावा लागणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Mar 2014 रोजी प्रकाशित
होळी, धूलिवंदनानिमित्त राज्यातील व्याघ्र प्रकल्प बंद
होळी, धूलिवंदनानिमित्त ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, मेळघाट, पेंच व सहय़ाद्री हे राज्यातील चारही व्याघ्र प्रकल्प सलग दोन दिवस १६ व १७ मार्च रोजी बंद ठेवण्यात आले आहेत.

First published on: 15-03-2014 at 12:35 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger project of maharastra close on holi