मनसेच्या बालेकिल्ल्यात आक्रमकपणे आंदोलन करण्याचा पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न फसल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी जिल्ह्यातील जवळपास सर्वच टोलनाक्यांवर पोलीस संरक्षणात नेहमीप्रमाणे टोलवसुली सुरू झाली. आदल्या दिवशी कुठे तोडफोड करीत तर कुठे टाळे ठोकून मनसे पदाधिकाऱ्यांनी काही काळ टोलवसुली बंद पाडली. परंतु, दुसऱ्या दिवसापासून सर्वच ठिकाणी नेहमीप्रमाणे टोलवसुली सुरू झाली. पुढील आदेश येईपर्यंत प्रतीक्षा केली जाणार असल्याचे सांगत स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी या विषयावर फारसे काही न बोलणे पसंत केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनाचे पडसाद सोमवारी टोलनाक्याच्या तोडफोडीद्वारे उमटू लागल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील टोलनाक्यांच्या बचावासाठी पोलीस यंत्रणा सरसावली. मनसे कार्यकर्त्यांनी विंचूर-प्रकाशा महामार्गावरील भाबडबारी घाटातील तर नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील ढकांब्याजवळील टोलनाक्यांची तोडफोड केली. याशिवाय, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव बसवंत आणि घोटी येथील टोलनाकाही रास्ता रोको करून बंद पाडला गेला. या घडामोडींमुळे काही काळ बंद पडलेली टोलवसुली मंगळवारी नेहमीप्रमाणे सुरू झाल्याचे पाहावयास मिळाले. या संदर्भात मनसे अध्यक्षांकडून पुढील निर्देश येईपर्यंत प्रतीक्षा करण्याचे धोरण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठेवल्याचे सांगण्यात आले.