उस्मानाबाद येथे मागील दहा दिवसात झालेल्या पावसासह परतीच्या पावसानेही नळदुर्ग परिसरात दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे येथील ऐतिहासिक किल्ल्यातील नर-मादी आणि शिलक धबधबे सुरु झाले आहेत. उस्मानाबाद, लातूरसह सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण असलेल्या नळदुर्ग किल्ल्यात यंदा करोनामुळे पर्यटक नाहीत. त्यामुळे अनलॉक-5 मधील पर्यटनाबाबतच्या निर्णयाकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अतिवृष्टीमुळे नळदुर्ग येथील बोरी धरण तुडूंब भरले आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होवून सांडवा सुरू झाला आहे. याचा परिणाम म्हणून नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले प्रेक्षणीय व नेत्रदीपक नर-मादी व शिलक हे दोन्ही धबधबे आज (मंगळवार) वाहण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र सध्या करोनामुळे नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला १५ मार्चपासून पर्यटकांसाठी बंद आहे. त्यामुळे यावर्षी पर्यटकांना हे दोन्ही धबधबे वाहताना पाहता येणार नाहीत. नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील नर-मादी धबधबा वाहताना पाहणे म्हणजे आपल्या डोळ्यांचे पारणे फेडून घेण्यासारखे आहे. अतिशय नेत्रदीपक व प्रेक्षणीय धबधबा म्हणून नर-मादी धबधब्याची ओळख आहे. या धबधब्यामुळे किल्ल्याचे सौंदर्य अधिकच वाढले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourists favorite nar madi waterfall started flowing in naldurg fort msr
First published on: 29-09-2020 at 18:04 IST