‘कांद्यात कांदा, नासका कांदा .. यांना बोचक्यात बांधा’, ‘ताई-माई अक्का, विचार करा पक्का ..वर मारा शिक्का’, ‘येऊन येऊन येणार कोण ..शिवाय दुसरा कोण’ अशा निवडणूक काळातील घोषणा आता हद्दपार होत असून घोषणांची जागा आता एसएमएस, फेसबुक आणि व्हॉट्सअप या आधुनिक माध्यमांनी घेतली आहे.
निवडणूक लोकसभेची की ग्रामपंचायतची, मतदारांपर्यंत पोहोचण्यास वेगवेगळ्या प्रचारतंत्राचा अवलंब केला जातो. १५ वर्षांपूर्वी संपर्काची साधारण साधने असताना उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून बॅनर, पॅम्पलेट, स्पीकरगाडय़ांचा वापर केला जाई. गावातून, गल्लीतून प्रचारफेरी काढत घोषणांची राळ उडवली जाई. पण त्यात प्रतिस्पर्धी उमेदवाराची अवहेलना होणार नाही याची दक्षताही घेतली जाई. मात्र, आता आचारसंहितेची बंधने व प्रचाराला मर्यादित कालावधी यामुळे प्रचाराच्या पारंपरिक पद्धती कालबाह्य़ होताना दिसत आहेत. संपर्काची आधुनिक साधने आल्यामुळे थेट मतदारांशी संपर्क करणे सहज शक्य झाले आहे. व्हॉट्सअप आणि फेसबुकने काही क्षणात लाखो लोकांपर्यंत सहज पोहोचता येते. याचा उमेदवारांनी वापर सुरूकेला आहे. या साधनातून मात्र उमेदवारांच्या समर्थकांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या चांगल्या गुणांचा, कामांचा प्रसार करण्याऐवजी वैयक्तिक पातळीवर िनदानालस्ती आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराची प्रतिमा मलिन करण्याचेच अवलंबले आहे. कार्यकत्रेही आलिशान गाडय़ांशिवाय प्रचारात उतरत नसल्यामुळे प्रचाराचा बाजही बदलला आहे. मागील काही वर्षांत सर्वच पक्षांना सत्तेची संधी मिळाल्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांची चंगळ झाली. त्यांचा थाटही पालटला. नेत्यांपुढे घोषणा द्यायच्या, नेत्याची पाठ फिरली की आपल्या उद्योगाला लागायचे, असा व्यावहारिक राजकीय उद्योग तेजीत आल्यामुळे निवडणुका महागडय़ा झाल्या आहेत.