महामार्गाचा वापर न करण्याचे रस्ते महामंडळाचे आवाहन
अकोला : समृद्धी महामार्गावरून लोकार्पणापूर्वीच अत्यंत धोकादायक वाहतूक होत आहे. परिणामी, अपघात होऊन अनेकांचे जीवदेखील गेले. यामुळे ‘समृद्धी’चे अधिकृत लोकर्पण होईपर्यंत महामार्गावरील वाहतुकीला निर्बंध घालण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. वाहनधारकांनी महामार्गाचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘लोकार्पणापूर्वीच समृद्धी महामार्ग ठरतोय जीवघेणा!’ या मथळ्याखाली बुधवारच्या ‘लोकसत्ता’च्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करून या गैरप्रकाराकडे लक्ष वेधण्यात आले होते. याची गंभीर दखल राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतली. समृद्धी महामार्गावर लोकार्पणापूर्वीच भरधाव वेगाने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे हा महामार्ग जीवघेणा ठरत असून अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या दोन अपघातात तिघांचे बळी गेले. यावर राज्य रस्ते विकास महामंडळाने स्पष्टीकरण दिले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण झालेले आहे. मात्र, त्याचे लोकार्पण झालेले नाही. यामुळे अधिकृतपणे वाहतुकीस परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही येथून अनधिकृत व विनापरवानगी वाहतूक, वर्दळ सुरू आहे. वाहतूक सुरक्षिततेची काही कामे सुरू आहेत. अनधिकृत वाहतुकीमुळे काही ठिकाणी अपघात होऊन जीवितहानीदेखील झालेली आहे. यामुळे अधिकृत घोषणा होईपर्यंत समृद्धी महामार्गाचा प्रवासासाठी उपयोग करू नये, असे आवाहन रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आले आहे.

सुरक्षिततेची काही कामे सुरू आहेत. अधिकृत घोषणा होईपर्यंत वाहनधारकांनी समृद्धी महामार्गाचा प्रवासासाठी उपयोग करू नये.- बी.पी. साळुंके, मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ.