मंदार लोहोकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून करोनाच्या सामान्य रुग्णालाही बेड उपलब्ध होत नसल्याचे वास्तव आहे. गावातल्या गावात करोना रुग्णांना उपचार मिळून रुग्ण त्वरित बरा व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेने पाच हजार लोकसंख्येच्या गावात ‘गाव तिथं कोविड केअर सेंटर’ उभारण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये महिला करोना रुग्णांवर महिला डॉक्टर आणि कर्मचारी उपचार करणार आहेत.

महिला रुग्णांना पुरुष वैद्यकीय अधिकारी वा आरोग्य कर्मचारी यांच्याशी त्यांना जाणवणाऱ्या व्याधी, त्रास सांगणे गैरसोयीचे वाटते. यामुळे अनेकदा योग्य उपचारांमध्येही अडथळे येऊ शकतात. महिला रुग्णांची ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्रामीण भागातील सध्या सुरू असलेल्या करोना काळजी केंद्रामध्ये महिला रुग्णांच्या आरोग्यसेवेसाठी महिला वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी करोनाग्रस्त महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेणार आहेत. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महिला वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. अशा प्रकारचा नावीन्यपूर्ण उपक्रम करणारी सोलापूर जिल्हा परिषद राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने घेतलेल्या या निर्णयाबद्दल ग्रामीण भागातील महिला रुग्णांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, प्रतिष्ठित ग्रामस्थांशी संवाद साधला आहे.

शहरातील मोठ्या दवाखान्यात जावे लागू नये, म्हणून ग्रामीण भागातील जनता आजार लपवत आहे. त्यांना शहरात जावे लागू नये, गावातल्या गावात उपचार करता यावेत, लक्षणे नसलेल्या व सौम्य करोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी गावपातळीवरच उपचाराची सोय व्हावी व शहरातील कोविड हॉस्पिटलवरील भार हलका व्हावा या उद्देशाने या उपक्रमाची जिल्हा परिषद प्रशासनाने सुरुवात केली आहे. यासाठी जिल्ह्यात नव्याने १०० करोना काळजी केंद्र उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्य:स्थितीत १२ गावात करोना काळजी केंद्रं सुरू झाली आहेत. राहिलेल्या गावातही १ मेपासून ही केंद्रे सुरू होणार आहेत.

– दिलीप स्वामी,

मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Treatment by female doctors on female patients initiative of solapur zilla parishad abn
First published on: 30-04-2021 at 00:00 IST