अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; १० कर्मचारी निलंबित, ११ जणांना पोलीस कोठडी

बुलढाणा जिल्ह्य़ाच्या खामगाव तालुक्यातील पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी आदिवासीमंत्र्यांनी विशेष चौकशी समिती स्थापन केली असून आश्रमशाळेची मान्यता रद्द करून गुन्हे दाखल झालेल्या १० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. शुक्रवारी आदिवासीमंत्री विष्णू सावरा, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी पोलिसांनी १३ आरोपींवर गुन्हे दाखल केले असून ११ आरोपींना अटक केली.

पाळा येथे श्री रामचंद्र महाराज सेवाभावी संस्था गणेशपूरद्वारा संचालित ही स्व. निंबाजी कोकरे अनुदानित शाळा आहे. या शाळेतील जळगाव खान्देश जिल्ह्य़ातील मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथील अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले. पालकांच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात अध्यक्ष गजानन निंबाजी कोकरे, सचिव संजय अण्णा कोकरे, सहसचिव पुरुषोत्तम गंगाराम कोकरे, इत्तुसिंग काळूसिंग पवार, भरत विश्वासराव लाहुडकार, डिगांबर राजाराम खरात, स्वप्निल बाबूराव लाखे, नारायण दत्तात्रय अंभोरे, दीपक अण्णा कोकरे, विजय रामुजी कोकरे, ललित जगन्नाथ वजिरे, मंठाबाई अण्णा कोकरे, शेवंताबाई अर्जुन राऊत आदींचा समावेश असून, यांपैकी ११ जणांना अटक केली आहे. आरोपींना शुक्रवारी खामगावच्या न्यायालयाने ७ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी आदिवासीमंत्र्यांनी विशेष चौकशी समिती गठित केली. या समितीमार्फत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या समितीत महिला आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश राहणार असून ही समिती राज्यभरातील आश्रमशाळांचीही पाहणी करणार आहे.

या आश्रमशाळेची मान्यता रद्द करून गुन्हे दाखल झालेल्या १० कर्मचाऱ्यांना निलंबित करीत असल्याचे आदिवासीमंत्र्यांनी जाहीर करून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. विशेषत: चौकशीसाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पोलीस तपासात पाळा येथील आदिवासी आश्रमशाळेतील अनेक चिमुकल्या विद्यार्थिनींवर बलात्कार झाल्याचे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचा कयासही व्यक्त केला जात आहे. या आश्रमशाळेत ३८० विद्यार्थी असून यात १०५ विद्यार्थिनी आहेत. या शाळेला अनुदानापोटी लाखो रुपये मिळत असतानाही येथील विद्यार्थी मात्र विविध सुविधांपासून वंचित आहेत.