हर्षद कशाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरवर्षी पावसाळ्यात मुंबई-गोवा महामार्गावर खड्डय़ांचा प्रश्न बिकट होतो. याच खाचखळग्यांतून आदळत आपटत कोकणवासीयांचा प्रवास सुरूच राहतो. गणेशोत्सवाच्या तोंडावर महामार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न चर्चेत येतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत रस्त्याच्या खड्डय़ाची चर्चा होते. संबंधित यंत्रणांना रस्तेदुरुस्तीची मुदत दिली जाते. थातुरमातुर कामे केली जातात. थोडय़ा पावासात पुन्हा तीच स्थिती, याचाच अनुभव मुंबईतून कोकणात निघालेल्या प्रवासी आणि वाहनचालकांना सध्या येतो आहे.

गेली नऊ वर्ष महामार्गाचे काम रखडलेलेच आहे. भूसंपादनातील दिरंगाई, पर्यावरण विषयक परवानग्या मिळवण्यात झालेला विलंब, ठेकेदाराची अकार्यक्षमता, निधीची कमतरता आणि आता टाळेबंदी यासारख्या कारणांमुळे महामार्गाचे काम लांबले आहे, पळस्पे ते इंदापूरपाठोपाठ आता इंदापूर ते झाराप या टप्प्यातील कामांची रखडपट्टी सुरू झाली आहे.

प्रवास करणे कठीण

महामार्गाची पेण ते इंदापूर मार्गातील परिस्थिती दयनीय आहे. पेण ते वडखळ दरम्यान तीच स्थिती आहे. वडखळ ते गडब, नागोठणे ते कोलाड, इंदापूर ते माणगाव, महाड ते पोलादपूर दरम्यानच्या महामार्गाची तीच स्थिती आहे. अनेक ठिकाणी पुलांची कामे अर्धवट अवस्थेत असून पुलाच्या लोखंडी शिगा बाहेर आल्या आहेत. महामार्गावर दिशादर्शक चिन्हांचा आभाव आहे. रस्त्यावर एकही सार्वजनिक स्वच्छतागृह अस्तित्वात नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे.

गणेशोत्सव आता बारा-तेरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास इच्छुक असलेल्या मुंबईकरांना राज्य सरकाने परवानगी दिली आहे. मात्र त्यांना दहा दिवसांचे विलगीकरण बंधनकारक केले आहे. १२ ऑगस्टपूर्वी कोकणात दाखल होण्याची सूचनाही केली आहे. खाजगी वाहनांतून जाणाऱ्यांना ई-पास काढण्याची सक्ती करण्यात आली आहे. गणेशभक्तांसाठी एसटीच्या विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र नेहमीप्रमाणे यावर्षी देखील त्यांच्या मार्गात खडय़ांचे विघ्न कायम आहे.

गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश देण्यात आले होते. खडी आणि माती टाकून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. पण पावासाचा जोर कायम असल्याने खडी-मातीच्या मलमपट्टीचा फारसा उपयोग झाला नाही. महामार्गावर ठिकठिकाणी बाह्य़वळणे देण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावत आहे.

प्रयत्न अपुरे..

मुंबई-गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी सुरळीत करावा असे निर्देश शासनाने दिले होते. मात्र रस्त्यांची दुरुस्ती करण्यात महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार अपयशी ठरले. पेण ते वडखळ, वडखळ ते नागोठणे, आणि कोलाड ते इंदापूपर्यंत महामार्गावर खड्डे होते. टॅक्टरमधून माती आणि खडी आणून खड्डे बुजवण्याचे प्रयत्न करण्यात आले. काही ठिकाणी पेव्हर ब्लॉकही लावण्यात आले. मात्र हे प्रयत्नही अपुरे ठरले आहेत.

महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. वाहने चालवताना त्रास सहन करावा लागतो आहे. खड्डय़ातून आदळत आपटत प्रवास करावा लागतो आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रस्त्याची दुरवस्था आहे.

– राजेश पाटील, वाहनचालक

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trouble for ganesh devotees due to potholes on mumbai goa highway abn
First published on: 11-08-2020 at 00:19 IST