शहरातील व्हॉलीबॉल खेळाडू तृप्ती उत्तेकर आणि शिवांगी बिडवे यांची अनुक्रमे महाराष्ट्राच्या युवा आणि वरिष्ठ संघात निवड झाली आहे.  तृप्तीची शेगांव येथे होणाऱ्या महाराष्ट्राच्या युवा संघात निवड झाली आहे. कराड येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत तृप्तीने नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट खेळ केल्याने महाराष्ट्राच्या सराव शिबिरासाठी निवडण्यात आलेल्या संभाव्य संघात तिची निवड करण्यात आली. त्यानंतर नागपूर येथे आयोजित सराव शिबिरातही तिने प्रभाव पाडल्याने तिची महाराष्ट्राच्या अंतिम संघात निवड झाली. तसेच वर्धा येथे आयोजित वरिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी शिवांगी बिडवेची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली. या दोन्हीही खेळाडूंची नागपूर येथे आयोजित १३ व्या अश्वमेघ स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठाच्या संघात सलग तिसऱ्यांदा निवड झाली. या दोन्ही खेळाडू टी. जे. चव्हाण शाळेच्या माजी विद्यार्थिनी असून सध्या त्या दोघीही केटीएचएम महाविद्यालयात शिकत आहेत. १०-१२ वर्षांपासून त्या व्हॉलीबॉलचा नियमित सराव करत असून याआधीही त्यांनी उपकनिष्ठ, कनिष्ठ गटाच्या तसेच महिला आणि शालेय राष्ट्रीय स्पर्धेत अनेक वेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. या खेळाडूंना कीर्तिकुमार गहाणकरी, राजेंद्र शिंदे, आनंद खरे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.