सर्वत्र रंगपंचमीचा जल्लोष सुरू असताना शहरातील प्रमुख बाजारपेठेला खेटून असलेल्या चाटी गल्लीत अचानकपणे आग लागून दोन जुने वाडे जळून खाक झाले. दुपारी दोनच्या सुमारास आगीची दुर्घटना घडली. तेथील रस्ते चिंचोळे असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविताना अग्निशामक दलाच्या जवानांना तारेवरची कसरत करावी लागली. सायंकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण आणण्यासाठी बचावकार्य सुरूच होते.

शहराच्या जुन्या गावठाण भागात पश्चिम मंगळवार पेठेत चाटीगल्लीचा परिसर बाजारपेठेसह व्यापाऱ्यांच्या निवासांनी गजबजलेला आहे. तेथील रस्ते अतिशय चिंचोळे आहेत. याच गल्लीत शिवशंकर काडादी यांचा ब्रिटिशकालीन भव्य वाडा आहे. या वाड्याजवळच प्रतिष्ठित अशा अब्दुलपूरकर कुटुंबीयांचे दोन ब्रिटिशकालीन दुमजली वाडे आहेत. सुंदर लाकडी नक्षीकामांच्या कलाकुसरींनी दिमाखदार ठरलेल्या या दोन्ही वाड्यांपैकी एका वाड्यात सुरूवातीला आग लागून धुराचे लोट उंचावर वाढत होते. नंतर काही वेळातच आगीचे लोण शेजारच्या वाड्यात पोहोचले. दोन्ही वाड्यांना लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. यात झालेल्या नुकसान प्रचंड मोठे असल्याचे सांगण्यात आले.

योगायोगाने सोलापूर महापालिका अग्निशामक दलाचे अधीक्षक केदारीनाथ आवटे हे आगग्रस्त वाड्यांजवळच एका खानावळीतून जेवणाचे पार्सल नेण्यासाठी आले होते. आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी अग्निशामक दलाचे पाण्याचे बंब मागविले. दुर्घटनास्थळाचा संपूर्ण परिसर छोट्या छोट्या रस्त्यांनी वेढलेला असल्यामुळे तेथे तात्काळ मदतकार्यासाठी धावून जाताना अग्निशामक दलासमोर अडथळे येत होते. त्यातच रंगपंचमीमुळे परिसरातील तरूणांच्या दुचाकी गाड्यांची गर्दी जास्त होती. त्यामुळे दूर अंतरावर अग्निशामक दलाच्या पाण्याच्या बंबांना थांबवून तेथून दूरवर पाईप नेऊन आगग्रस्त वाड्यांवर पाण्याची फवारणी करावी लागत होती. सायंकाळी सहा वाजेपर्यंत २० बंब वापरून पाणी फवारले तरी आग आटोक्यात येत नव्हती.

सिद्रामप्पा ऊर्फ तम्मा नागप्पाआण्णा अब्दुलपूरकर यांच्या मालकीचे हे दोन्ही वाडे आहेत. दुपारी रंगपंचमीची लगबग सुरू असताना एका वाड्यात अचानकपणे आग लागली. घरगुती स्वयंपाकाच्या सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे किंवा शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.