वर्ध्यातल्या हिंगणघाट भागात हरतालिकेचे विसर्जन करताना तोल जाऊन दोन महिला आणि दोन लहान मुलं बुडाल्याची घटना घडली आहे. वणा नदीच्या पात्रात हे चारजण बुडाल्याची घटना दुपारच्या सुमाराला घडली. पोलीस कर्मचारी तातडीने मदतीला धावून गेले. दोनपैकी एका महिलेला पोलीस कर्मचाऱ्याने बाहेर काढलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. उर्वरित तिघांचा शोध सुरु आहे.

आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. रविवारी हरतालिकेची पूजा होती. ती आटोपल्यानंतर आज हरतालिकेचे विसर्जन करण्यासाठी वणा नदी रेल्वे पुलाजवळ असलेल्या कवड घाटावर विसर्जनासाठी दोन महिला गेल्या होत्या. त्यांच्यासोबत दोन लहान मुलंही होती. विसर्जन करताना एक मुलगा नदीत पडली. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या आईने पाण्यात उडी घेतली. त्याची बहीणही त्याला वाचवण्यासाठी नदीपात्रात गेली. मात्र चौघेही जण बुडाले. एका पोलीस कर्मचाऱ्याने एका महिलेला कसेबसे वाचवले मात्र डॉक्टरांकडे घेऊन गेले असता डॉक्टरांनी या महिलेला मृत घोषित केले. आता वणा नदी पात्रात तिघांचा शोध घेतला जातो आहे. NDRF चे पथक बेपत्ता महिला आणि दोन मुलांचा शोध घेत आहेत.