पुणे-बेंगलोर महामार्गावर शिरवळ येथे मौल्यवान रक्तचंदनाची विनापरवाना चोरटी वाहतूक करणाऱ्या तीन मालट्रकवर वनविभागाने छापा टाकून २२ टन रक्तचंदनासह पावणेदोन कोटींचा माल ताब्यात घेतला.
उपवनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी याबाबत सांगितले की, रक्त चंदनाची चोरटी वाहतूक होणार असल्याचे वन विभागाला खबऱ्यांकडून समजल्यानंतर पुणे- बेंगलोर महामार्गानजीक शिरवळ-पंढरपूर रस्त्यावर वैशाली ढाब्याजवळ पुण्याच्या दिशेला निघालेले तीन ट्रक अडवून त्याची झडती घेतली असता काथ्याखाली लपविलेली रक्तचंदनाची ओंडकी आढळून आली. तर इतर दोन ट्रकमध्ये रासायनिक पावडरच्या पोत्याखाली ओंडके लपविलेले होते. या तीनही ट्रकमध्ये २२ हजार ७६० किलो रक्तचंदनाचे लाकूड मिळाले.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तीनही ट्रक चालकांना ताब्यात घेतले असून नागराज एस सुग्रमणी, गरया बासा एस, राजकुमार टी थंगादुराई यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर भारतीय दंड विधान वनअधिनियम १९२७चे कलम ४१(२ब)खाली विनापरवाना रक्तचंदनाची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
चेन्नई येथून हे रक्तचंदन मुंबईला नेण्यात येत होते. अतिदुर्मिळ वनस्पती प्रकारात ही वनस्पती समजण्यात येते. या वृक्षाची तोड करणे व वाहतूक करणे कायदय़ाने गुन्हा समजण्यात येतो, असेही प्रवीण यांनी सांगितले. या कारवाईत सहायक वनसंरक्षक डी.पी. खाडे व खंडाळयाचे वनक्षेत्रपाल सोनावणे, पश्चिम घाट विकासचे सहायक वनसंरक्षक महादेव मोहिते, वनसर्वेक्षक उदय कुभार यांनी भाग घेतला.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2014 रोजी प्रकाशित
पावणेदोन कोटींचे रक्तचंदन जप्त
पुणे-बेंगलोर महामार्गावर शिरवळ येथे मौल्यवान रक्तचंदनाची विनापरवाना चोरटी वाहतूक करणाऱ्या तीन मालट्रकवर वनविभागाने छापा टाकून २२ टन रक्तचंदनासह पावणेदोन कोटींचा माल ताब्यात घेतला.
First published on: 13-04-2014 at 03:42 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two crore blood sandalwood seized