सांगली : कुणाच्या शेताचा रस्ता भावकीच्या तिढ्यातून अडलाय, विहिरीत पाणी असून, पाईपलाईन अभावी पीक वाळत आहे, तर कुणाच्या घरी सासूची तक्रार, पती नांदवत नाही, पोटगीही देत नाही, तर म्हातारपणी मुलगा, सून सांभाळ करत नाहीत, अशा एक ना अनेक तक्रारीचं भेंडोळं घेऊन थोरल्या सायबाच्या भेटीसाठी आसुसलेली सामान्य जनता. अशा सामान्यांना प्रशासनाचं दार आठवड्यातून दोन दिवसांसाठी खुलं ठेवण्याचा निर्णय नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी घेतला आणि गाऱ्हाणं मांडण्यासाठी सामान्यांची कार्यालयात सोमवारी झुंबड उडाली.

आजपर्यंतचा पायंडा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगीने भेटीची वेळ सायंकाळी तीन ते पाच अशी होती. अन्य वेळी सामान्यांना खुलेपणाने आत प्रवेश मिळतच नव्हता. मात्र, लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांना वेळ मिळत होती. सामान्य माणसासाठी प्रशासनाचे दार मात्र बंदच असायचे. जिल्हाधिकारी काकडे यांनी यात बदल करण्याचा निर्णय घेतला आणि याची अंमलबजावणी सोमवारी झाली.

आठवड्यातील सोमवार आणि शुक्रवार सामान्यांना जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाचे दार खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. भेटीसाठी कोणतीही पूर्व परवानगीची गरज भासणार नाही. या काळात आपले म्हणणे ऐकून घेण्यासाठी जिल्हाधिकारी समक्ष उपस्थित राहणार असून, तक्रारीची तातडीने दखलही घेतली जाणार आहे. संबंधित विभागाला या निवेदनाची तातडीने दखल घेऊन काय कार्यवाही झाली याचा अहवाल द्यावा लागणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हाधिकारी कार्यालयात विनापरवाना भेट मिळतच नव्हती. जर भेटीची वेळ मिळाली असली तर अचानकपणे एखाद्या लोकप्रतिनिधींचा राबता अथवा मंत्रीमहोदयाचा दौरा असेल तर सामान्यांच्या नजरा बंद दारावर खिळलेल्या असतात आशाळभूतपणे. आता प्रशासनाचे दार सताड उघडल्याने पुन्हा एकदा नजरेत आशा निर्माण झाली आहे.
.