बीड: जिल्ह्यात दहावीची परीक्षा देणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. गेवराई तालुक्यातील दिमाखवाडी व बीड शहरातील छत्रपती कॉलनी येथे या घटना घडल्या. आत्महत्यांचे कारण समजू शकले नाही.

बीड शहरातील पालवण रस्त्यावरील छत्रपती कॉलनीतील सृष्टी रोहिदास काळे (वय १६) या विद्यार्थिनीचा मृतदेह मंगळवारी घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सृष्टी ही मामाच्या घरी आजी-आजोबासह राहत होती. आईचे निधन झालेले असून वडील पुण्याला असतात अशी माहिती समोर आली आहे. तर  दिमाखवाडी ( ता.गेवराई ) येथील भाग्यश्री भागवत भोईटे (वय १७) या दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरातील पत्र्याच्या आडुला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी घडली. तिचा मृतदेह  बीडच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मृत मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवला आहे.

अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू

बीड जिल्ह्यातील रेवकी देवकी (ता.गेवराई) येथील गायरान परिसरातील आदिवासी (पारधी) समाजाच्या वस्तीवर मयुरी नवनाथ चव्हाण (वय १४ वर्ष, रा. रेवकी देवकी ) ही बाजेवर मृत अवस्थेत आढळून आली. झोपेतच तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत्यूचे कारण मात्र अजूनही स्पष्ट झाले नाही. अंतिम शवविच्छेदन अहवाल राखून ठेवला असून त्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल असे सूत्रांनी सांगितले.