एसटी बस आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोन युवक ठार झाले. नाशिक जिल्ह्यातील येवला-वैजापूर रस्त्यावरील अंदरसूल गावालगत रविवारी हा अपघात झाला.
बाभूळगाव खुर्द येथील सबीर रसिक शेख (२०) व नईम नवाब शेख (२२) हे दोघे वैजापूरकडून येवल्याच्या दिशेने मोटारसायकलने येत होते. सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास येवल्यापासून आठ किलोमीटर अंतरावरील नागेश्वरी मंदिराजवळील वळणावर त्र्यंबक-लोणार या बसशी मोटारसायकलची धडक बसली. धडक इतकी जोरात होती की, दोघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर चालक वैजापूर येथील पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला. अपघाताची येवला पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.