विरार पश्चिम आगाशी येथे धूळवडीसाठी वापरला जाणारा फुगा लागल्याने दुचाकी आणि सायकलस्वाराचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यात सायकलवरील ५४ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून अर्नाळा पोलिसांनी दुचाकी चालकांना ताब्यात घेतले आहे.
फुगे मारण्यावर बंदी असतानाही होळीच्या सणाच्या वेळी अनेक जन रस्त्यावर जाणाऱ्यांना फुगे मारून आपला आनंद साजरा करत असतात. पण त्यामुळे अनेकांना दुर्घटनेचे बळी व्हावे लागत आहे. अशीच एका घटना आज (गुरुवार) आगाशी चाळपेठ परिसरात घडली आहे. बूट पॉलिशचे दुकान बंद करून होळी सण साजरा करण्यासाठी घरी चालेलेल्या रामचंद्र हरिनाथ पटेल हे या घटनेचे बळी ठरले आहेत. रामचंद्र हे सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास विरारवरून चाळपेठच्या दिशेने जात असताना, होळीसाठी लाकडं आणायला गेलेल्या एका गाडीतून काही मुलं पाण्यानी भरलेले फुगे रस्त्यावर फेकून मारत होते. यातील एक फुगा अर्नाळा ते विरारच्या दिशेने दुचाकीवरून येणाऱ्या मुलांना लागला आणि त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते सायकलवरून घरी जात असलेल्य रामचंद्र यांना जावून धडकले. यात रामचंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रामचंद्र यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि दोन दुचाकी स्वारांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. दुचाकीस्वार हे अर्नाळा गावातील तरुण आहेत.
यासंदर्भात माहिती देताना अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी फुगा लागल्याने अपघात झाला की नाही? हे स्पष्ट केले नाही. पण चौकशी करून अपघाताचे कारण सांगितले जाईल असे ते म्हणाले.