तारापुर औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यात काम करणाऱ्या दोन महिला सफाई कामगारांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कामाच्या जागी बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या महिलांना उपचारासाठी बोईसर येथील रूग्णालयात दाखल केले असता डाँक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. महत्त्वाचे म्हणजे कारखानदारांच्या हलगर्जीपणा मुळे महिलांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना त्यांच्या कुटुंबीयांनी काही काळासाठी रूग्णवाहिका अडवून ठेवल्याची घटना घडली होती.
तारापुर औद्योगिक क्षेत्रातील में.वेलियंट ग्लास वर्क या कारखान्यात झुमली काळू मावी (४५), वर्षू बाळू मावी (१९) या महिला कामगार सफाई करण्याचे काम करित होत्या. सोमवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास कारखान्यातील बाँयलर जवळ पडणारा कोळशा साफ करत होत्या. त्यानंतर काही वेळाने त्या दोघी त्या ठिकाणी बेशुद्धावस्थेत पडलेल्या दिसल्या.
दरम्यान, त्यांना त्वरित उपचारासाठी बोईसर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डाँक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोन्ही महिलांचे मृतदेह तारापुर येथील प्राथमिक आरोग्य क्रेंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून घटनेचा अधिक तपास बोईसर पोलीस करित आहेत. महिला कर्मचारी भट्टी जवळ साफसफाई करण्याचे काम करतात. कामाच्या ठिकाणी महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या असल्याने त्यांना रूग्णालयात दाखल केले. परंतु त्यांना डाँक्टरांनी मृत्यू घोषित केल्याची माहिती कर्मचारी पवन राहोती यांनी बोलताना दिली.