महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दोन महिला पुजाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी ही घोषणा केली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ब्राह्मणेतर पुजाऱ्यांच्या नेमणुकीपाठोपाठ महिला पुजाऱ्यांची नेमणूक करणे हा आणखी एक क्रांतिकारी निर्णय मानला जात आहे.
शासनाने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ताब्यात घेतल्यानंतर मंदिरातील व्यवस्थापनात मोठे बदल सुरू केले. याअंतर्गतच पुजारी पदासाठी सर्व जातीतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यातून नुकतीच ब्राह्मणांसह अन्य जातीतील १० पुजाऱ्यांची समितीच्यावतीने नेमणूक करण्यात आली. यानंतर काल रात्री उशिरा समितीच्या वतीने दोन महिला पुजाऱ्यांची नेमणूक जाहीर केली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील शेकडो वर्षांच्या पूजेच्या परंपरेत महिला पुजाऱ्यांची नेमणूक ही प्रथमच होत असून पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासात यानिमित्ताने एक नवे पर्व जोडले जाणार आहे.
 नेमणूक करण्यात आलेले हे सर्व पुजारी १ ऑगस्टपासून सेवेत रूजू होणार आहेत. त्यांनी दरमहा सहा हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याचेही श्री डांगे यांनी जाहीर केले.