सांगली : मविआमधून बंडखोरी केलेले विशाल पाटील यांच्यावर कारवाई टाळत केंद्रातील मोदी सरकार घालविण्यासाठी मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न करावेत असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी गुरूवारी सांगलीत झालेल्या मेळाव्यात केले.

मविआमध्ये जागा वाटपावरून उबाठा शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात निर्माण झालेल्या वादानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आज सांगलीत पार पडला. आमदार पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास विधीमंडळ नेते  बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

मविआच्या उमेदवारीवर काँग्रेसचा नैसर्गिक हक्क असताना तो डावलून उबाठा शिवसेनेच्या वाट्याला सांगलीची जागा मिळाली. यामागे मोठे षढयंत्र असून त्याचा योग्य वेळी खुलासा होईलच, पण सद्यस्थितीत  भाजपचा पराभव करायचा या हेतूने आघाडी धर्माचे पालन करून मविआचा उमेदवार विजयी करणे सर्वांची जबाबदारी आहे असेही पटोले यांनी सांगितले.

हेही वाचा >>> देवेंद्र फडणवीसांचा ‘मविआ’वर हल्लाबोल; म्हणाले, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त…”

सांगलीतील काँग्रेस एकसंघ झाल्याचे चित्र होते. याला कोणाची तरी दृष्ट लागली आणि ही दृष्ट उतरविल्याशिवाय मी राहणार नाही असे सांगून पटोले म्हणाले, हा चक्रव्यूह कसा भेदायचे हे मला ज्ञात आहे. येत्या चार महिन्यात त्याचे उत्तर मिळेल. जागा वाटपाच्या चर्चेत मी फसलो. मात्र, येथूेन पुढे भाजपला हरवणे हेच आपले उदिष्ट नजरेसमोर ठेवून काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना माजी मंत्री थोरात व माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगलीच्या भावना तीव्र आहेत हे मान्य करत त्यापेक्षा भाजपला पराभूत करणे आवश्यक असल्याचे सांगितले. स्वागत व प्रास्ताविक करताना डॉ. कदम म्हणाले, अखरेच्या क्षणापर्यंत आपण उमेदवारीसाठी लढा दिला. मात्र, एकसंघ  झालेल्या काँग्रेसला कोणाची तरी दृष्ट लागली. मात्र, याचा वचपा आपण काढल्याविना शांत बसणार नाही.

हेही वाचा >>> रायगड: पत्नीनेच पतीविरोधात दिली बलात्काराची तक्रार, माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दरम्यान, या मेळाव्यात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई होते का याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, कारवाई टाळत प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी याबाबतचा अहवाल दिल्लीला पाठविला जाईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगून बंडखोरीवर तात्काळ कारवाईची शक्यता टाळली. दरम्यान, काँग्रेसचा मेळावा पार पडल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या दरम्यान, काँग्रेसचे नेतेही सभास्थळ सोडून निघून गेले होते.