रत्नागिरी : कोकणात कोणताही उद्योग प्रकल्प येऊ घातला की विरोधक रस्त्यावर उतरून नकारात्मक वातावरण निर्माण करतात. यापुढील काळात येथे रिफायनरीसारखे चांगले उद्योग येण्यासाठी त्यांच्या समर्थकांनीही रस्त्यावर उतरून पाठिंबा दिला पाहिजे, असे स्पष्ट मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने कोकण उद्योग मंथनह्ण हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच सामंत रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांच्या वतीने सामंत यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कोकणातील उद्योगाच्या सद्यस्थितीचे सडेतोड शब्दात विश्लेषण करताना उद्योगमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील पहिल्या ठिकाणी रिफायनरी रद्द झाली. नंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या जागेबाबत सर्वेक्षण करत आहोत, असे केंद्र सरकारला पत्र लिहिले. परंतु उद्योगमंत्री म्हणून मला असे वाटते की, रिफायनरी किंवा कोणताही उद्योग हवा असेल तर या प्रकल्पाच्या पाठीराख्यांनी मनापासून समर्थनार्थ रस्त्यावर उतरले पाहिजे. परंतु हे लोक वातानुकूलित खोलीत बसून चर्चा करतात आणि उद्योग नकोह्ण म्हणणारे रस्त्यावर उतरून संघर्ष करतात. त्यामुळे कोकणात उद्योग हवे, असे म्हणणारे रस्त्यावर येत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही उद्योगाला येथे स्थैर्य मिळणार नाही.

अदानी, अंबानी अशा मोठय़ा उद्योजकांसठी रेड कार्पेट अंथरली जाते. परंतु ५० लाख रुपयांचा उद्योग करणाऱ्या लघु उद्योजकाचेही आम्ही त्याच पद्धतीने स्वागत करून सेवा देण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने राज्याचे इन्सेंटिव्ह धोरणह्ण लवकरच मांडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत वर्षभरात जिल्ह्याला ५५० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. तसेच रत्नागिरीसह राज्यातील महिला बचत गटांना फ्लिपकार्ट कंपनीच्या सहकार्याने विक्रीची जोड देण्याची योजना असल्याचेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, ट्रस्ट बोर्ड अध्यक्ष आशिष पेडणेकर, पर्यटन समितीचे अध्यक्ष संतोष तावडे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.