मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवारी सातारा येथे आली. यावेळी घेण्यात आलेल्या सभेमध्ये भाजपामध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पहिल्यांदाच भाजपाच्या मंचावर दिसले. राष्ट्रवादी काँग्रसेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात गेलेल्या उदयनराजे भोसले यांनी या वेळी जवळजवळ ४५ मिनिटांचे भाषण केले. या भाषणामध्ये त्यांनी खास आपल्या शैलीत कॉलर उडवत राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका केली.

आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणामध्ये उदयनराजेंनी आपण राष्ट्रवादीमध्ये असताना कशाप्रकारे आपल्याला डावलले गेले, अनेकदा सरकारी अधिकाऱ्यांकडे खेटे घालूनही आपली कामे कशाप्रकारे झाली नाहीत यासारख्या अनेक विषयांवर भाष्य करत राष्ट्रवादीवर टिका केली. त्याचप्रमाणे जनतेचं काम करणाऱ्यांना जनता निवडून देते, त्यामुळेच भाजपाला इतक्या मोठ्या प्रमाणात मते मिळाली असल्याचे उद्यनराजे यांनी सांगितले. भाषणाच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये त्यांनी आपल्या स्टाइलमध्ये कॉलर उडवत फिल्मी डायलॉग मारला. ‘आज एक कमीटमेंट तुम्ही माझ्याकडून तुम्ही घ्या. जे मी बोलतो त्याच्याबरोबर बोला. एक बार जो मैने कमीटमेंट कर दी तो मैं अपनी खूद की भी नही सुनता,’ असं म्हणत उदयनराजेंनी मुख्यमंत्री मंचावर बसलेले असतानचा कॉलर उडवली. ‘मी जे काही बोललो ते सांगणं माझं कर्तव्य होतं. जास्त वेळ न घेता, पण मी भाषणासाठी भरपूर वेळ घेतला,’ अशा शब्दांमध्ये उदयनराजेंनी आपले भाषण आवरते घेतले. उदयनराजेंची ही कॉलर उडवणारी स्टाइल पाहून मुख्यमंत्र्यांबरोबर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मंचावर उपस्थित असणाऱ्या इतर नेत्यांनाही हसू आले.
पहा व्हिडीओ –

मुख्यमंत्र्यांनाही टोला

भाषणासाठी जास्त वेळ लागल्याचे सांगताना उदयनराजेंनी आपल्या मिश्कील शैलीमध्ये मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
मुख्यमंत्री आणि सगळेजण दररोज प्रवासात असतात. त्यांना काय माईक सोडत नाही आणि ते माईकला सोडत नाहीत. कधीतरी आमच्यासारख्यांना संधी आली त्यांच्यामुळे तर मी कशाला माईक सोडतोय,’ असं उदयनराजे हसतच म्हणाले. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.