राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन भाजपात आलेले उदयनराजे भोसले यांनी पुण्यात झालेल्या भाजपाच्या मेळाव्याला अनुपस्थित राहिले. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. आज पुण्यात भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पश्चिम महाराष्ट्र मेळाव्यात उदयनराजे भोसले येणे अपेक्षित होते. मात्र ते आलेच नाहीत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या मेळाव्याला हर्षवर्धन पाटील, रणसिंह मोहिते पाटील हेदेखील हजर होते मात्र उदयनराजे भोसले का नव्हते? याबाबत आता तर्क लावण्यास सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी व्यासपीठावर उदयनराजे एका बाजूला उभे राहिले होते. ते फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. तसेच निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आणि निकालाची तारीख जाहीर केली. मात्र साताऱ्याची पोट निवडणूक कधी होणार ते सांगितलेच नाही त्यामुळेही उदयनराजे नाराज झाले आहेत अशी चर्चा रंगली होती. आता आज पुण्यात झालेल्या भाजपाच्या मेळाव्याला त्यांची हजेरी नव्हती. त्यामुळे याचा अर्थ काय घ्यायचा? याचा प्रत्येक जण आपल्या परिने अंदाज लावतो आहे.

उदयनराजे भोसले हे त्यांच्या बिनधास्त स्टाईलसाठी ओळखले जातात. ते भाजपात जातील की नाही? याची चर्चाही बराच काळ रंगली होती. अखेर त्यांनी स्वतःच ट्विट करुन भाजपात जाणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेशही केला. मात्र त्यानंतर ज्या काही घडामोडी समोर येत आहेत त्यावरुन उदयनराजे भोसले कदाचित नाराज असावेत असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होताना दिसतो आहे. अशात आज उदयनराजे भोसले हे पुण्यात झालेल्या मेळाव्यातही आले नाहीत त्यामुळेही राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.