Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीला त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहचले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह अनिल परब आणि संजय राऊत यांचीही उपस्थिती आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मागच्या तीन महिन्यांतली ही चौथी भेट आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे पाहिलं जातं आहे. मात्र अद्याप या भेटीचा तपशील काही समोर आलेला नाही.
उद्धव ठाकरे अचानक राज ठाकरेंच्या निवासस्थानी
उद्धव ठाकरे हे अचानक राज ठाकरे यांच्या घरी गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मागील ४० ते ४५ मिनिटांपासून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु असल्याचे समजते. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी आहे? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, ठाकरे बंधूंच्या या वाढत्या भेटीगाठी या मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याचे द्योतक मानले जात आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेचा तपशील ठाकरे बंधू एकमेकांमध्ये बोलत असावेत अशी शक्यता आहे.
गणपती उत्सवातही उद्धव ठाकरे पोहचले राज ठाकरेंच्या घरी
यापूर्वी उद्धव ठाकरे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच शिवतीर्थवर गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यादेखील शिवतीर्थवर गेल्या होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरी भोजनचा आस्वादही घेतला होता. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते. त्यामुळे ठाकरे बंधू हे वेगाने एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता आणखी वाढली आहे.
किशोरी पेडणेकर यांनी काय म्हटलं आहे?
सत्ताधारी हे महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरत आहेत. आता दोन बंधू जर या सगळ्याला तोंड देण्यासाठी एकत्र येत असतील तर त्यात काय चुकीचं काय? मुख्य प्रवाहातले नेते राज ठाकरेंना भेटायला गेले आहेत. जे घडतंय ते चांगलंच घडतं आहे. मतदारांनाही आनंद झाला आहे असं मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम या भेटीबाबत काय म्हणाले?
कुणाचीही भेट होऊ शकते. आधी ते भेटत होते पण गेल्या अनेक वर्षांपासून ते का भेटत नव्हते? मुंबई महापालिकेच्या दृष्टीकोनातून कोण कुणाला भेटतं आहे याला काही महत्त्व नाही. मेट्रो, सीसीटीव्ही कॅमेरे, बीडीडी चाळीतल्या मराठी माणसांना घर कुणी उपलब्ध करुन दिलं? हे सगळं मुंबईकरांना माहीत आहे. गेल्या ११ वर्षांत मोदींच्या सरकारने आणि देवेंद्र फडणवीस सरकारने केलेल्या विकासाच्या प्रयत्नांममुळे मुंबईकर महायुतीच्या मागे भक्कमपणे उभा आहे. आपल्याला २०१७ च्या निवडणुकीत, २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दिसलं. तसंच आताही तु्म्हाला महायुतीला पाठिंबा कसा मिळतो ते दिसेल असं अमित साटम यांनी म्हटलं आहे.