शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सामना’ ला दिलेल्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात पहलगाम हल्ल्याबाबत त्यांची भूमिका मांडली. संजय राऊत यांनी त्यांना जो प्रश्न विचारला त्याबाबत उद्धव ठाकरेंनी उत्तर तर दिलंच. दरम्यान असा काही हल्ला झालाच कसा असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
काश्मीरच्या पहलगाममध्ये जो भीषण अतिरेकी हल्ला झाला तो घडलाच कसा? याचं कारण असं की काश्मीरमध्ये परिस्थिती पू्र्ववत झाली आहे असं सातत्याने सांगण्यात आलं. ती व्हायलाच पाहिजे. काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे त्यामुळेच शिवसेनेने ३७० कलम हटवण्यासाठी पाठिंबा दिला. पर्यटन पुन्हा सुरु झालं होतं. पुरेसा बंदोबस्त ठेवण्याची गरज होतीच. सगळं काही आलबेल आहे असं समजून खूप काळ अशांत राहिलेल्या भागाकडे दुर्लक्ष करु शकत नाही. या हल्ल्याची जबाबदारी अतिरेकी म्हणून नाही पण जो काही गाफिलपणा झाला, दुर्लक्ष झालं ती कुणी घेतली? कुणीच घेतली नाही. सैन्याने जी कारवाई केली त्यांच्या शौर्याला सलाम. पण जे पर्यटक त्या ठिकाणी गेले होते. आपलं काश्मीर पाहण्यासाठी, कुटुंबियांसह क्षण घालवण्यासाठी जे पर्यटक गेले होते. सगळ्यांच्या डोळ्यांदेखत होत्याचं नव्हतं गेलं. अनेक भगिनींचं कुंकू पुसलं गेलं याला जबाबदार कोण? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
पहलगाममध्ये अतिरेकी आलेच कसे?
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, “भौगोलिकरित्या तो परिसर खूप आतमध्ये आहे. इतक्या आतमध्ये अतिरेकी आलेच कसे? शिवाय आता पहलगाम हल्ला होऊन तीन महिने झाले, त्यांचा शोध तर सोडाच अजूनही अतिरेक्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. पहिली चित्रं प्रकाशित गेली, त्यानंतर ती बरोबर नाही असं सांगण्यात आलं. त्या अतिरेक्यांना शोधता आलेलं नाही हे सरकारचं अपयश आहे. कारण तुमच्याच भरवशावर तिकडे नागरिक, पर्यटक गेले होते. कारण काश्मीरमध्ये जायला लोक घाबरत होते. आता सरकारने सांगितलं की सगळी परिस्थिती वेगळी आहे. हिंदुस्थान वेगळा आहे. असं काही केलं तर घुसून मारु, हे काम सैन्याचं असतं ते श्रेय तुम्ही घेऊ नका.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पाकिस्तानवर कारवाई करणाऱ्या सैन्याचे पाय काय ओढले-उद्धव ठाकरे
यानंतर संजय राऊत यांनी प्रश्न विचारला की मोदींच्या काळात पठाणकोट हल्ला झाला, त्यांच्या काळात पुलवामा झालं, मोदींच्या काळात पहलगाम झालं. अशा प्रकारे काश्मीरमध्ये रक्त सांडलं जातं आहे. आपल्याकडून राजकीय कारवाया निवडणुकीच्या दृष्टीने होतात. तसंच ऑपरेशन सिंदूर झालं. त्या ऑपरेशन सिंदूरला तुम्ही पाठिंबा दिला. पण पाकिस्तानचं कंबरडं मोडूनच भारत माघार घेईल अशी स्थिती तिकडे होती त्याचं काय? हे विचारलं असता, उद्धव ठाकरे म्हणाले, “एक क्षण असा आला होता की पाकिस्तान आपण मोडून टाकतोय आणि आपलं स्वप्न पूर्ण होतं आहे. आपण पाकिस्तानचे तुकडे करु अशी परिस्थिती निर्माण झाली. कराचीवर हल्ला झाला, लाहोरवर हल्ला वगैरे बातम्या बघत होतो. पण अचानक सगळं थांबलं. त्याचं कारण गुलदस्त्यात आहे. सैन्याचे पाय तुम्ही का ओढले? सैन्य पराक्रमाची शर्थ करुन घुसलं होतं. सैन्याबाबत कुणाच्या मनात शंका येणार नाही.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पाकिस्तानचा प्रश्न धुमसत असताना मंत्र्यांची मुलं दुबईत जाऊन मॅच पाहतात
आपले पंतप्रधान शूर आहेत त्यांची छाती ५६ इंची आहे असं विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, अमेरिकेच्या अध्यक्षांनी २७ वेळा सांगितलं की भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम मी घडवून आणला. ट्रम्प म्हणाले तसं हजारो वर्षे नाही पण गेले अनेक वर्षांपासून काश्मीर, पाकिस्तानचा प्रश्न धुमसतो आहे. पहलगामचा हल्ला, इतर हल्ले झाले तरीही तुम्ही डिप्लोमसी वगैरे करत आहात. दुबईत जाऊन तुमची मुलं पाकिस्तानची मॅच पाहतात. आपल्या समाजातली मुलं सैन्यात जात आहेत आणि मंत्र्यांची मुलं क्रिकेट मॅच पाहतात. ट्रम्प यांच्या दबावाखाली भारत आणि पाकिस्तानमधला संघर्ष थांबत असेल तर भारत कमकुवत होतो आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर असाच अर्थ होतो. देशाच्या स्वाभिमानापेक्षा यांना व्यापार महत्त्वाचा आहे. निवडणुकीचा व्यापार केला, सत्तेचा व्यापार केला आता देशाचाही व्यापार केला जातो आहे. व्यापाऱ्यासमोर यांना देश गौण वाटतो आहे. मोदींचं नेतृत्व कचखाऊ आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनी जे बोललो ते पुन्हा सांगतो, भाजपाला पंतप्रधान आहे, गृहमंत्री आहे, संरक्षण मंत्री आहेत पण देशाला पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री नाहीत. अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली.