शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज ( २७ ऑगस्ट ) हिंगोलीत सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार, राज्यातील शिंदे सरकार आणि आमदार संतोष बांगर यांचा समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( केसीआर ) यांनाही लक्ष्य केलं. हे उपरे नेते येत आहेत, त्यांना सांगा आम्हाला उपऱ्या नेत्यांची गरज नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केसीआर यांच्यावर केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “काहीजण बाहेर राज्यातून येत आहेत. जणू महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कोणी वालीच नाही. एकतर त्यांच्या आणि आपल्या भाषेत फरक आहे. ‘अब आयेगी किसान सरकार’ असं घोषवाक्य त्याचं आहे. हे जे उपरे नेते येतात त्यांना सांगा, आम्हाला उपऱ्या नेत्यांची गरज नाही.”

हेही वाचा : “मटक्याचे अड्डे चालवणाऱ्याला हिंदुत्ववादी म्हणायचं का?” उद्धव ठाकरेंच्या टीकेला बांगर प्रत्युत्तर देत म्हणाले…

“भाजपाची सुपारी घेऊन हे मते फोडण्यासाठी येत असतील, तर पहिलंच सांगतो, तुमचं घर आधी सांभाळा. कारण, तुमच्या घरात बुडाला सुरूंग लागला आहे,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केसीआर यांच्यावर केली.

हेही वाचा : “गद्दाराला नाग समजून पूजा केली, पण…”, उद्धव ठाकरेंचा संतोष बांगरांवर हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शेतकरी हवालदील झाला आहे. आपला हिंगोलीत कार्यक्रम असताना पलीकडे ‘सरकार आपल्या दारी’ सुरू आहे. ‘सरकार आपल्या दारी, थापा मारते लय भारी.’ हे थापा मारणारे सरकार आहे. दुष्काळाच्या उंबरठ्यावर आपण आहोत. तरी, अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. शेतकऱ्यांच्या हिताचं चिरडून टाकायचं, एवढंच काम इथे बसलेले आणि दिल्लीत यांचं मायबाप बसलेत, ते करत आले आहेत,” असं टीकास्र शिंदे आणि मोदी सरकारवर उद्धव ठाकरे यांनी सोडलं.