शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असे उघड दोन गट पडले आहेत. या गटबाजीमुळे शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. आमदारकी शाबूत ठेवायची असेल तर बंडखोर आमदारांच्या गटाला कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावे लागेल, असा दावा केला जातोय. असे असताना शुक्रवारी (२३ जुलै) मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी शिंदे गटाकडून विलिनीकरणाचा प्रस्ताव आला तर त्यावर विचार करु, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लक्ष्य केले आहे. किती जणांचा केमिकल लोचा झाला असेल हे सांगता येत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ते मुंबईत शिवसैनिकांना संबोधित करत होते.

हेही वाचा >> “मला पुष्पगुच्छ नको पण…” निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना मागितल्या महत्त्वाच्या ‘दोन गोष्टी’

“अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला. पण हा प्रयत्न शिवसेना संपवण्याचा आहे, हे लक्षात ठेवा. सगळे कायदेतज्ज्ञ सांगत आहेत की त्यांना (शिंदे गट) कोणत्यातरी पक्षात जाण्याखेरीज पर्याय नाही. काल त्यांना एका पक्षाने ऑफर दिलेली आहे. त्यामुळे किती जणांचा केमिकल लोचा झाला असेल, हे सांगता येत नाही,” अशी मिश्किल टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली.

हेही वाचा >> “वडील आणि पक्ष चोरायला निघाले, तुम्ही मर्द नव्हे तर दरोडेखोर” उद्धव ठाकरेंनी केले शिंदे गटाला लक्ष्य

“बिकाऊ असणारे सगळे गेले आहेत. आता त्यांनी वेगवेगळ्या एजन्सीज कामाला लावल्या आहेत. त्यांच्याकडे पैसा अमाप आहे. ही लढाई पैसा विरुद्ध निष्ठा अशी आहे. ही साधी माणसं माझे वैभव आहे. तुम्ही कितीही पैसा ओतलात तरी हे वैभव त्याला पुरुन उरल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >> “छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत, अवमान सहन करणार नाही.” ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विनोद पाटलांचा इशारा

“त्यांना शिवसेनेला संपवायचे आहे. पण ठाकरे आणि शिवसेना हे नाते घट्ट राहणार. तुमच्या कित्येक पिढ्या उतरल्या तरी त्यांना पाताळात गाडून आम्ही येऊ. त्यांना शिवसेना आणि ठाकरे हे नाते तोडायचे आहे. ही बंडखोरी नाही. ही हरामखोरी आहे. हा नमकहरामीपणा आहे. एवढीच मर्दुमकी असेल तर माझ्या वडिलांचा म्हणजेच शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावू नका. हिंमत असेल तर स्वत:च्या नावाने मतं मागा,” असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

“हे (शिवसेनेतील बंडखोर आमदार) माझे जुने सहकारी आहेत. याआधी त्यांनी माझ्यासोबत काम केलेले आहे. मला याबद्दल तांत्रिक माहिती नाही. पण उद्या त्यांच्याकडून असा प्रस्ताव आला तर मी नक्की विचार करेन,” असे राज ठाकरे म्हणाले होते. तसेच माझ्यासाठी सर्वप्रथम माझा महाराष्ट्र सैनिक असेल. बाकी सगळे नंतर येतील, असे राज ठाकरे यांनी शनिवारी (२३ जुलै) स्पष्ट केले होते.