ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोल्याच्या पाणीप्रश्नावर काढलेली पदयात्रा नागपूरच्या वेशीवर पोहोचली असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं. या मुद्द्यावरून विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला. तसेच, स्वत: नितीन देशमुख यांनीही सरकारवर परखड शब्दांत टीका केली. या मुद्द्यावरून राजकारण रंगत असताना ठाकरे गटानं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. सामनातील अग्रलेखातून ठाकरे गटानं देवेंद्र फडणवीसांवर आगपाखड केली आहे.

“भारतीय जनता पक्ष व त्यांचे पुढारी एक नंबरचे नौटंकीबाज लोक आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा एक फोटो स्वतःच प्रसिद्ध केला. टेबलावर फायलींचा ढिगारा असून ‘मिशन नो पेंडन्सी’च्या नावाखाली देवेंद्र महोदय फायली क्लीअर करताना त्या छायाचित्रात दिसत आहेत. वास्तविक कामाचा डोंगर मंत्रालयात साचला आहे आणि देवेंद्र त्या डोंगरावर आक्रमण करीत आहेत हे खरेच आहे, पण त्या फायली नक्की कोणाच्या आहेत? रोजगार, पाणी, शेतकरी यांच्याबाबत त्या फायली आहेत काय?” असा प्रश्न ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे.

“फडणवीस स्वत:चे फोटो काढून घेतायत, पण…”

“फडणवीस हे अकोल्याचे पालकमंत्री आहेत व अकोल्याची जनता एक-एक घोट पाण्यासाठी तडफडत आहे. खारे पाणी, जे विषारी आहे ते पिऊन दिवस ढकलत आहे. या पाण्यामुळे अनेक जण रोगाने बेजार झाले आहेत, पण पालकमंत्री फडणवीस टेबलावर फायलीचा डोंगर निर्माण करून सह्या करतानाचे स्वतःचे फोटो काढून घेत आहेत. अहो देवेंद्र महाशय, बाकीचे सोडा, पण त्या फायलींच्या ढिगाऱ्यात अकोला पाणीप्रश्नाची फाईल आहे काय? तेवढे काय ते बोला”, असा खोचक सवालही ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.

“…त्याची शिक्षा सरकार अकोल्याच्या जनतेला देतंय का?”

“नितीन देशमुख हे एक झुंजार आमदार आहेत. लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे लोकप्रतिनिधी आहेत. ‘मिंधे’ गटाने त्यांनाही गुवाहाटीला धरून नेले होते, पण मोठय़ा शिताफीने ते स्वतःची सुटका करून घेऊन परत आले. खऱ्या शिवसेनेवरील त्यांच्या निष्ठा अविचल आहेत व त्यांनी मतदारांशी व मूळ पक्षाशी बेइमानी केली नाही. याची शिक्षा मिंधे-फडणवीस अकोल्याच्या जनतेला देत आहेत काय?” असा सवालही अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.

“…तर तत्काळ राजकारणातून निवृत्ती घेईन”, खारघर प्रकरणावरून नरेश म्हस्केंचं सुषमा अंधारेंना खुलं आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुलाबराव पाटील यांच्यावरही खोचक टीका

“महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पाणी खात्याचे जे ‘गुलाबी’ मंत्री आहेत, त्यांनीच पाण्याच्या नावावर पाण्यासारखा पैसा ओरपला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजना, जल जीवन मिशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या सगळ्यात मोठा भ्रष्टाचार उघडपणे सुरू आहे. त्या भ्रष्टाचाराची फाईल देवेंद्र महोदयांच्या टेबलावरील डोंगरात आहे काय? विरोधी बाकांवरील आमदारांच्या मतदारसंघात लोकांना पाणीही मिळू द्यायचे नाही हा विचार अमानुष आहे आणि पाणी मागण्यासाठी निघालेल्या आमदारांना अटक करणे म्हणजे डरपोक हुकूमशहाची दंडुकेशाही आहे. विदर्भातील नेतेच वैदर्भी जनतेचे खरे शत्रू आहेत. अशा राज्यकर्त्यांच्या घशात तेच खारे पाणी ओतायला हवे”, अशा शब्दांत ठाकरे गटानं आपला रोष व्यक्त केला आहे.