तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव अर्थात केसीआर हे नुकतेच महाराष्ट्रातील सोलापूर दौऱ्यावर आले होते. दोन दिवसांच्या दौऱ्यात केसीआर यांनी पंढरपुरात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतलं, पुढे ते तुळजाभवानी देवीच्या दर्शनालाही गेले. पंढरपुरात घेतलेल्या जाहीर सभेत केसीआर यांनी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते आपल्याला घाबरत असल्याचं विधान केलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणातही त्याचे पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून केसीआर यांच्या या दौऱ्यावर आणि त्यांच्या राजकीय खेळीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
“राष्ट्रीय राजकारणाचा किडा…”
भारतीय जनता पक्ष के चंद्रशेख राव आणि त्यांच्या बीआरएस या पक्षाचा वापर करून घेत असल्याचा दावा सामनातील अग्रलेखातून करण्यात आला आहे. “खरं तर केसीआर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात येण्याची गरज नव्हती. त्यांचा एक प्रादेशिक पक्ष होता व त्यांचे उत्तम चालले होते, पण राष्ट्रीय राजकारणाचा किडा राव यांच्या डोक्यात घुसला तो घुसलाच”, असं यात नमूद करण्यात आलं आहे.
केसीआर यांच्या मुलीची मद्य घोटाळाप्रकरणी चौकशी
“२०२४ मध्ये केसीआर यांचा पक्ष सत्तेत राहील की जाईल, याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केसीआर यांच्या कन्या कविता यांचा पराभव झाला. याच कविता यांना दिल्लीतील मद्य घोटाळाप्रकरणी ‘ईडी’ने चौकशीसाठी पाचारण केले. दिल्लीतील ‘आप’चे सरकार व तेलंगणातील काही मद्य ठेकेदार यांच्यात मध्यस्थाची भूमिका कविता यांनी बजावली व त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी ‘केसीआर’ यांच्या कन्येवर चौकशीचा ससेमिरा लावला. केंद्रीय तपास यंत्रणा दबावाचे राजकारण करीत असल्या तरी आम्ही त्यांच्यापुढे झुकणार नाही, लढत राहू, अशी गर्जना केसीआर यांनी केली. मात्र त्यानंतर ते जी राजकीय पावले टाकत आहेत ती भाजपास अप्रत्यक्ष मदत होईल अशा प्रकारचीच आहेत”, असा थेट दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
“ओवेसी हे मतांचे विभाजन करण्यासाठी २०१९मध्ये महाराष्ट्रात व इतर राज्यांत गेले. त्यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली, पण आता ओवेसींचा डाव लक्षात आल्याने मुस्लिम व दलित हे एमआयएमच्या कच्छपी लागणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच भाजपने आता ओवेसी यांच्या जागी केसीआर यांना उतरवले आहे काय? केसीआर व त्यांचा पक्ष भाजपची ‘बी’ टीम म्हणून काम करत आहे काय?” असे प्रश्न ठाकरे गटानं उपस्थित केले आहेत.
ठाकरे गटाचा KCR यांना इशारा!
“वास्तव हे आहे की, तेलंगणात केसीआर यांच्या पक्षाच्या पायाखाली हादरे बसत आहेत. मात्र त्याचा बदला ते महाराष्ट्रात घेत असतील तर ते देशहिताला चूड लावीत आहेत. केसीआर यांच्या कर्तबगारीविषयी कुणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही, पण ते ज्या प्रकारचा डाव खेळू पाहत आहेत तो त्यांचा डाव नसून दुसरेच कोणीतरी त्यांना वापरून घेत आहे. त्यामुळे तेलंगणातले त्यांचे तेलही जाईल व महाराष्ट्रातले तूपही हाती लागणार नाही”, असा इशारा ठाकरे गटानं केसीआर यांना दिला आहे.