Uddhav Thackeray महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत विविध प्रश्नांवर भाष्य केलंं आहे. दरम्यान याच मुलाखतीच्या दुसऱ्या भागात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे. मी सल्ला देतो आहे टोमणा मारत नाही त्यांनी ऐकायचं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. तसंच मोदींवरही त्यांनी टीका केली आहे.
भाजपाला सगळ्या गोष्टींमध्ये व्यापारच दिसतो-उद्धव ठाकरे
आपले पंतप्रधान शूर आहेत त्यांची छाती ५६ इंची आहे असं विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, अमेरिकेच्या अध्यक्षांनी २७ वेळा सांगितलं की भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम मी घडवून आणला. ट्रम्प म्हणाले तसं हजारो वर्षे नाही पण गेले अनेक वर्षांपासून काश्मीर, पाकिस्तानचा प्रश्न धुमसतो आहे. पहलगामचा हल्ला, इतर हल्ले झाले तरीही तुम्ही डिप्लोमसी वगैरे करत आहात. दुबईत जाऊन तुमची मुलं पाकिस्तानची मॅच पाहतात. आपल्या समाजातली मुलं सैन्यात जात आहेत आणि मंत्र्यांची मुलं क्रिकेट मॅच पाहतात. ट्रम्प यांच्या दबावाखाली भारत आणि पाकिस्तानमधला संघर्ष थांबत असेल तर भारत कमकुवत होतो आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर असाच अर्थ होतो. देशाच्या स्वाभिमानापेक्षा यांना व्यापार महत्त्वाचा आहे. निवडणुकीचा व्यापार केला, सत्तेचा व्यापार केला आता देशाचाही व्यापार केला जातो आहे. व्यापाऱ्यासमोर यांना देश गौण वाटतो आहे. मोदींचं नेतृत्व कचखाऊ आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनी जे बोललो ते पुन्हा सांगतो, भाजपाला पंतप्रधान आहे, गृहमंत्री आहे, संरक्षण मंत्री आहेत पण देशाला पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री नाहीत. अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझा सल्ला आहे की…
महाराष्ट्राच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होते का? असं विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, “नाही, चर्चा फार होत नाहीत. सुरुवातीला जाऊन मी त्यांना गुच्छ दिला होता. आहेत ते मुख्यमंत्री, मानो या मानो. तुमच्याकडून चांगलं व्हावं अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. उलट आत्ता जे काही त्यांच्या सहकारी मंत्र्याच्या भानगडी, लफडी, कुलंगडी बाहेर येत आहेत ती त्यांनी मोडीत काढावीत. आमचे कधीकाळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतो आहे, हे माझं मत आणि सल्ला आहे टोमणा नाही. जर देवेंद्र फडणवीस हे नीती वगैरे सगळ्या गोष्टी मानत असतील तर त्यांच्या प्रतिमेला तडा देणारं हे काम आहे, कुठे जमिनी लाटल्या जात आहेत, कुठे धक्काबुक्की होते आहे, कुठे तीन हजार कोटींची चोरी सुप्रीम कोर्ट पकडून देतं आहे, या सगळ्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस बदनाम होत आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली भ्रष्टाचार म्हणजे दिव्याखाली अंधार तसा हा प्रकार आहे.”