शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन गट पडले आहे. अगदी बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटाला गळती लागली आहे. ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. अलीकडेच उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. भूषण देसाईंचं शिंदे गटात प्रवेश करणं ठाकरे गटाला मोठा धक्का समजला जात आहे.

भूषण देसाई यांच्या पक्षप्रवेशाची घटना ताजी असताना उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. पक्षप्रवेश सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीपक सावंत यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा- “सर्वोच्च न्यायालय हाच एकमेव आशेचा किरण”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचं मी मनापासून शिवसेनेत स्वागत करतो. दीपक सावंत यांनी मंत्री म्हणून काम केलंच आहे. पण बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी मंत्री नसतानाही अतिशय दुर्गम भागात काम केलं. त्याचा परिणाम देखील लोकांना पाहायला मिळाला. दुर्गम भागात चांगले उपचार मिळाले पाहिजेत, अशी संकल्पना त्यांनी मांडली. त्यांचा रुग्णालयांनादेखील फायदा झाला. शासकीय रुग्णालयात ज्या त्रुटी आहेत, त्या निदर्शनास आणून देणे आणि त्यावर उपाय करणे, याबाबतही त्यांनी मोठं काम केलं. आरोग्य मंत्री असताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना मोठी सेवा दिली.”