काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये मोदी आडनावावरून केलेल्या विधानामुळे सुरतमधील न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकी रद्द केली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. “माफी मागायला मी सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे, गांधी कुणाचीही माफी मागत नाही,” असं विधान राहुल गांधी यांनी केलं.

राहुल गांधींच्या विधानावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं. मणिशंकर अय्यर यांनी जेव्हा सावरकरांचा अपमान केला, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पुतळ्याला चपलेनं मारलं होतं, असं उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या प्रतिमेला मारणार का? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला. यावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर पलटवार केला. आधी स्वत:च्या कानफटात मारून घे, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना दिला. ते छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या ‘वज्रमूठ’ सभेत बोलत होते.

हेही वाचा- “…तर तुम्ही मिंध्यांचं काय चाटलं”, उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर हल्लाबोल!

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “सावरकरांनी सलग १५ वर्षे दररोज मरण भोगलं. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्या यातना भोगल्या. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, म्हणून त्यांनी हे सगळं भोगलं नाही. हेच स्वातंत्र आज धोक्यात आलं असेल तर, भाजपामधल्या सावरकर भक्तांना तरी हे मान्य आहे का? आम्हाला तर मान्य नाही. आम्ही तरी हे होऊ देणार नाही. आपल्याला अनेक क्रांतीकारांनी सांडलेल्या रक्ताची शपथ घेऊन घटनेचं रक्षण करायचंय. नाहीतर आपल्याच देशात आपण गुलाम बनल्याशिवाय राहणार नाही.”

हेही वाचा- “पोलिसांना मस्ती आली असेल, तर…”; संभाजीनगरमधील सभेतून अंबादास दानवेंची थेट धमकी, नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदेंना उद्देशून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “तुम्ही आम्हाला विचारताय त्यांच्या (राहुल गांधी) थोबाडीत माराल का? आधी स्वत:च्या कानफटात मारून घे. आम्हाला शिकवायला जाऊ नका. आमचे विचार स्पष्ट आहेत. आमचं हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नाहीये. मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवाय, हे शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे.”