शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. यासंदर्भात उद्धव ठाकरेंची कोणतीही प्रतिक्रिया कालपासून समोर आली नव्हती. अखेर आज दुपारी मातोश्रीवर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, उद्या अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडेही लक्ष असल्याचं ते म्हणाले.
“मला वाटतं की प्रत्येक पक्षाला पक्षांतर्गत व्यवस्थापन काय असावं, हे ठरवण्याचा अधिकार असतो. मला वाटतं की महाविकास आघाडीला कुठेही तडा जाईल अशी कोणतीही गोष्ट राष्ट्रवादीत घडेल असं मला वाटत नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “मी त्यांना कोणता सल्ला देऊ शकत नाही. मी दिलेला सल्ला त्यांना पटला नाही तर काय करणार? उद्या त्यांचा निर्णय होऊ द्या. त्यानंतर काय ते बोलेन”, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.
“माझ्याकडून मविआला तडा जाईल असं काही होणार नाही”
“महाविकास आघाडीला माझ्याकडून तडा जाणार नाही याची काळजी मी घेईन. तसं मी काही बोलणार नाही किंवा करणार नाही. पण मी असंही म्हणेन, की देशात हुकुमशाही येणार नाही असं मानणाऱ्या लोकांची एकता व्हायला हवी. मी व्यक्तीचा पराभव करायला मागत नाही, वृत्तीचा पराभव करायची इच्छा असते. त्यासाठीच हुकुमशाही वृत्तीचा पराभव करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं असं माझं म्हणणं आहे”, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
शरद पवारांच्या आत्मचरित्रातील ‘त्या’ उल्लेखावर प्रतिक्रिया
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी फक्त दोन वेळा मंत्रालयात जाणं आपल्याला आवडलं नसल्याचा उल्लेख शरद पवारांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात केल्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली होती. त्यावरही उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. “प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार असतो. मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं हे जगजाहीर आहे. प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य वाटतो. यापलीकडे काही बोलणं योग्य नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.