शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जैतापूर परिसरात झालेल्या जाहीर सभांमध्ये प्रस्तावित अणू ऊर्जा प्रकल्पाला स्पष्ट विरोध नोंदवला, मात्र युतीच्या निवडणूक जाहीरनाम्यात या मुद्दय़ाचा समावेश करण्याबाबत हमी दिली नाही.  उद्धव यांचा बहुचर्चित आणि दीर्घकाळ लांबणीवर पडलेला जैतापूर परिसराचा दौरा अखेर आज झाला. या वेळी साखरीनाटे येथे मच्छीमारांचा मेळावा, तर माडबनला स्थानिक ग्रामस्थांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी बोलताना उद्धव यांनी प्रस्तावित अणू ऊर्जा प्रकल्प आणणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. तसेच गरज पडल्यास प्रकल्पाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडून संपूर्ण महाराष्ट्र त्यामागे उभा करण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार केला.
साखरीनाटे येथील मेळाव्यात बोलताना मच्छीमार नेते अमजद बोरकर आणि मन्सूर अली यांनी अणू ऊर्जा प्रकल्पाचे गंभीर धोके लक्षात घेऊन शिवसेनेने अशा प्रकल्पांना विरोध करण्याची भूमिका आगामी निवडणूक जाहीरनाम्यात घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत या संदर्भात उद्धव यांना छेडले असता, त्याबाबत सर्वाशी चर्चा करून भूमिका घेतली जाईल, असे मोघम उत्तर त्यांनी दिले. तसेच या संदर्भात मित्रपक्ष भाजपाच्या भूमिकेबाबतही सारवासारव केली. त्यामुळे जाहीर सभेत राणा भीमदेवी थाटात गर्जना केल्या तरी प्रत्यक्षात या मुद्दय़ावर शिवसेना निर्वाणीची भूमिका घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे उघड झाले. एन्रॉन प्रकल्पाबाबत युतीने दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप फेटाळून लावत, आमचे फक्त करारातील मुद्दय़ांबाबत मतभेद होते, असा खुलासा उद्धव यांनी केला.
    आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून युतीतर्फे कोणाला उमेदवारी देणार, याबाबतच्या प्रश्नालाही त्यांनी योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे सांगत बगल दिली. जैतापूर प्रकल्प वगळता अन्य कोणत्याही राजकीय विषयांवर टिप्पणी करण्यासही उद्धव यांनी नकार दिला.