इंडिया आघाडीने उपराष्ट्रपती पदासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आज बी. सुदर्शन रेड्डी मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी उपस्थित होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांचा सत्कार केला. तसंच रेड्डी निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.

देशात लोकशाही टिकवायची असेल तर..

देश एका विचित्र परिस्थितीत नेला जातो आहे. त्या परिस्थितीत देश जाऊ नये म्हणून जर आपण ही परिस्थिती थोपवू शकलो तर देशातली लोकशाही वाचेल. त्यामुळे १५० वर्षांनंतर गुलामगिरीतून आपली मुक्तता झाली आहे. त्या गुलामगिरीकडे देश जाणार नाही. संख्याबळावर जर निवडणूक अवलंबून असती तर निवडणूक घेण्यातच अर्थ नाही.मतदानात गोपनीयता आहे त्यामुळे ज्यांच्या मनात छुप्या पद्धतीने देशासाठी प्रेम आहे असे एनडीएतले खासदारही आम्हाला मतदान करु शकतील. राज्यसभा आणि लोकसभेचा कारभार कसा चालला आहे ते सगळे पाहत आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ज्यांनी माझा पक्ष चोरला त्यांच्या विनंतीला काय अर्थ आहे?

देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला होता हे सत्य आहे. माझा पक्ष चोरला, माझा पक्ष फोडला तरीही त्यांच्या विनंतीला काय अर्थ आहे? राष्ट्रपतीपदाची निवडणूक होती तेव्हा न मागता मतदान केलं होतं. पण औपचारिकता म्हणूनही मला कुणी धन्यवाद दिले नाहीत. आता गरज असेल तेव्हा वापरा आणि गरज नसेल तेव्हा फेकून द्या या पद्धतीलाच आता नाकारलं पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मी आता देवेंद्र फडणवीसांना फोन करणा आणि तुम्ही रेड्डींना मतदान करा असं आवाहन करणार आहे-उद्धव ठाकरे

उपराष्ट्रपती अचानक राजीनामा देतात, प्रकृतीचं कारण देतात. त्यांच्याविषयी कुणाला काही माहीत नाही. हे सगळंच हे गूढ वाढवणारं आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. बी. सुदर्शन रेड्डी हे आमचे म्हणजे इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. या पदाला एक सन्मान आहे. त्यामुळे त्या पदावर एक जबाबदार व्यक्ती बसली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. देशप्रेम असलेल्या खासदारांनी रेड्डींना मतदान केलं पाहिजे असं आवाहन मी करतो आहे. मी आज देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन बी. सुदर्शन रेड्डींना मतदान करण्याबाबत सांगणार आहे असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.