Uddhav Thackeray Slams BJP over Nehru: “भाजपाच्या लोकांचा स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभाग नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही यांचा सहभाग नव्हता. हे आता आयत्या बिळावर नागोबा सारखे बसले आहेत आणि लोकांकडून दूध पाजले जावे, अशी त्यांची अपेक्षा आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली. जनसुरक्षा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी विविध पक्ष आणि संघटनांची राज्यव्यापी परिषद आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “भाजपाने कधी आदर्श उभे केले नाहीत. विचार निर्माण केला नाही. त्यामुळे ते दुसऱ्यांचे आदर्श चोरण्याचे काम करतात. मग जरा काही वेगळे झाले तर मग ते नेहरूंच्या काळात झाले, असे म्हणायचे. नेहरूंना दोष देणाऱ्यांच्या हातात गेल्या ११ वर्षांपासून सत्ता आहे. मग तुम्ही काय करत आहात. तुम्ही काही करू शकलात का?”

नेहरूंना पंतप्रधान करून चूकच झाली

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या भाषणात नेहरूंच्या ऐवजी सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असते तर…, असा मुद्दा मांडला होता. त्यांच्या मुद्द्याचा आधार घेत उद्धव ठाकरे म्हणाले, “सपकाळ यांचे हे म्हणणे मला पूर्ण मान्य आहे. अगदी महात्मा गांधी किंवा इतर कुणी नेहरूंना पंतप्रधान करून चूकच केली. सरदार वल्लभभाई पंतप्रधान झाले असते तर आज संघ वर दिसलाच नसता.”

म्हणून वल्लभभाईंचा पुतळा उभारला

वल्लभभाई पटेल यांनी संघावर बंदी घातली होती. ती बंदीच उठली नसती. मग सांगा नेहरू हवे की, वल्लभभाई पटेल. मग भाजपाकडून पटेल यांचा सर्वात मोठा पुतळा उभारण्यात आला. मध्यंतरी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार होते. पण त्यांच्या नातेवाईकांनी विरोध केल्यानंतर ते मागे पडले. सरकारचा टेबिल टेनिस सुरू आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.