Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज त्यांचे मोठे बंधू असलेल्या उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा द्यायला मातोश्रीवर आले ही बाब राजकारणात चर्चेची ठरली आहे. तसंच या दोघांनी बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो समोर काढलेला फोटोही चर्चेत आला आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे आभार मानले आहेत.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“सगळ्यांना खरोखर मनापासून धन्यवाद. ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासमोर मी नम्रपणे नतमस्तक होतो आहे.” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सगळ्यांचे आभार मानले. त्यानंतर राज ठाकरे यांनी दिलेल्या शुभेच्छांबाबत आणि मातोश्रीवर त्यांनी येण्याबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला गेला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी याबाबत प्रतिक्रिया दिली. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरेंना सकाळपासूनच शुभेच्छांचे मेसेज आणि फोन येत आहेत. दरम्यान त्यांचे बंधू राज ठाकरे यांनी मातोश्रीवर येत त्यांना एक चांगलं सरप्राईज दिलं. यामुळे आपण आनंदी झाल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“राज आल्याने वाढदिवसाचा आनंद द्विगुणितच नाही तर कित्येक पटीने गुणित झाला आहे. पुढचं सगळं काही चांगलं होईल याचा मला विश्वास आहे. अनेक वर्षांनी आम्ही दोन भाऊ एकत्र भेटलो. ज्या घरात एकत्र राहिलो, वाढलो तिथे आम्ही गेलो. ज्यांनी आम्हाला वाढवलं त्या बाळासाहेबांपुढे नतमस्तक झालो. बऱ्याच वर्षांनी राजने घरी येऊन शुभेच्छा दिल्या. त्यामुळे कित्येक पटीने मला आनंद झाला आहे. माझ्यासाठी ही बाब फारच महत्त्वाची आहे.” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंन या भेटीबाबत एक पोस्टही केली आहे.

५ जुलैला पहिल्यांदा दोन ठाकरे बंधू एकत्र
मराठीच्या मुद्द्यावर ५ जुलैला झालेल्या विजयी मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. त्यावेळी दोघांची मराठी बाबतची भाषणंही गाजली. दरम्यान महापालिका निवडणुकीची ही नांदी आहे का? असं विचारलं असता राज ठाकरे म्हणाले की तो प्रश्न नंतरचा आहे. आम्ही मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र आलो होतो. यानंतर २२ दिवसांनी राज ठाकरे यांनी थेट मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंना चकित केलं. उद्धव ठाकरे आणि रजा ठाकरे यांचा बाळासाहेबांच्या तसबिरीसमोरचा फोटोही व्हायरल झाला आहे. आगामी काळात दोन ठाकरे बंधू निवडणुकांसाठी एकत्र येतील का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.