रत्नागिरी: राज्याच्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले आहे.

कोकणातील गुहागर विधानसभे मधून निवडून आलेले आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना असा राजकीय प्रवास केला आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून झाली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. मागील काही दिवस भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी त्यांची नाराजी उघड बोलून ही दाखवली होती. नुकतेच भास्कर जाधव यांचे बंधू बाळा जाधव यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा फटका बसला होता.

आमदार भास्कर जाधव यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदापासून राज्याच्या मंत्रिमंडळात नगरविकास, वन, बंदरे, विधीमंडळ कामकाज, क्रीडा, युवक कल्याण यासह वेगवेगळी मंत्रिपदे भूषविली आहेत. ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत परतलेले भास्कर जाधव एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतरही ठाकरेंच्या सोबतच राहिले. ते या निवडणुकीत कोकणातील ठाकरे गटाचे एकमेव आमदार आहेत. भास्कर जाधव हे अतिशय आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळख असलेले भास्कर जाधव याचा फायदा आता पक्षाला होणार आहे.

विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचं नावही चर्चेत होते. मात्र अंतिम शिक्कामोर्तब जाधव यांच्या नावावर झाले आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत ही निवड करण्यात आल्याने आता या नावाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून मंजुरी मिळते का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर भास्कर जाधव यांची नियुक्ती करावी अशी मागणी करणारे पत्र शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला शरद पवार यांच्या पक्षाने ठेवल्याची चर्चा सुरू झाली असताना त्यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले असून त्यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच वर्षांचा कोणताही फॉर्म्युला नसल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.